दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
सुप्तावस्थेत असलेला राज्याचा सत्तासंघर्ष टोकाला जाऊ शकतो,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवसेंदिवस आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे. फडणवीस व अजित पवार,या दोघांमध्ये वाढत असलेली जवळीक,दिल्ली दरबारी अजित पवार यांना मिळणारे झुकते माप व आपल्या पक्षाला मिळणारी सावत्रपणाची वागणूक,या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे समांतर आता सरकार चालवू पाहत आहेत.तसेच संघटनात्मक स्तरावरही शिंदे यांनी फडणवीस यांच्यावर गेल्या काही दिवसापासून कुरघोडी करण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.कोकणात त्यांच्या पक्षात जोरदार इनकमिंग सुरु झाले आहे.भाजपच्या तुलनेत कोकणात त्यांच्या पक्षाचा विस्तार वेगाने होत आहे. कोकणात आपल्या पक्षाचा जनाधार वाढ़वण्यासाठी त्यांनी किरण व उदय सामंत या दोन बंधुसमवेत राजन साळवी यांची यांची दिलजमाई घडवून आणली.त्यामुळे भाजपच्या गोटात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
महायुतीमध्ये राहून आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी खस्ता खाल्लेले एकनाथ शिंदे हे भाजपवर सध्या प्रचंड नाराज आहेत.ते नाराजीबद्दल उघडपणे बोलत नसले तरी त्यांच्या प्रत्येक कृतीमधून त्यांची नाराजी पाहायला मिळत आहे.त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या बहुतेक बैठकांना हजेरी लावली नाही.खातेवाटप व पालकमंत्रीपदाच्या वादानंतर त्यांनी थेट आपले गाव गाठले होते.त्यांच्या या नाराजीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली.त्यानंतरही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळू शकला नाही.सध्या राज्यातील विकासकामांचा आढावा फडणवीस यांच्या वॉररूम मधून घेण्यात येतो.आता एकनाथ शिंदे यांनी याच धर्तीवर शिवसेनेकडे असलेल्या खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र वॉर रुम स्थापन केली आहे.मात्र त्यांनी या रूमला वॉर रूम असे नांव न देता को – ऑर्डीनेशन कक्ष, असे गोंडस नांव दिले आहे.एकनाथ शिंदे यांची ही कृती देवेंद्र फडणवीस यांना आव्हान असल्याचे समजले जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या या रूमच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकमेकांसमोर उभे ठाकल्याची चर्चा होत आहे.गेल्या काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका वगळता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना बोलावलेल्या अनेक विभागाच्या बैठकांना जाणे,जाणीवपूर्वक टाळले.फडणवीसांच्या उपस्थितीत झालेल्या अगदी स्वत:च्या विभागाच्या बैठकांनाही शिंदे हजर राहिले नाहीत.फडणवीस यांनी बोलावलेली १०० दिवसाची आढावा बैठक असो किंवा अलीकडे आयोजित करण्यात आलेली महापालिकांसंदर्भातील बैठक असो,एकनाथ शिंदे एकाही बैठकिला हजर नव्हते.
एकनाथ शिंदे यांच्या या रूम मधून शिवसेनेकडे असलेल्या नगरविकास,म्हाडा, एमएसआरडीसी,एसआरए, गृहनिर्माण,अशा महत्वाच्या खात्याचा आढावा घेण्यात येणार आहे.त्यामुळे सरकारी अधिकारी आणि सचिवांना वॉर रुमच्या बैठकांप्रमाणे शिंदे यांच्या को – ऑर्डीनेशन कक्षाच्या बैठकांनाही हजर राहावे लागणार आहे.त्यामुळे एक समांतर सत्ता तयार होऊ शकते.
एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याची सूत्रे असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून अनेक गरजू आणि गरीब रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली होती.मात्र,आता मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे हा कक्षही एकनाथ शिंदे यांच्या हातातून गेला आहे.त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनीही उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची स्थापना केली आहे.या कक्षाच्या प्रमुखपदी पुन्हा एकदा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे माजी प्रमुख मंगेश चिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या सर्व घडामोडी लक्षात घेता महायुतीमध्ये सत्तासंघर्ष सुरु झाला असून सध्या तो सुप्तावस्थेत असला तरी येणाऱ्या काळात तो उफाळून वर येऊ शकतो.

