संजय लांडगे, वाडा
वाड्याच्या आत्मा मलिक शाळेला परदेशी पाहुण्यांची सदिच्छा भेट,
वाडा तालुक्यातील अंभई येथील आत्मा मालिक शाळा आणि आश्रमास पोलंड, जर्मनी आणि स्वित्झर्लंड येथून आलेल्या परदेशी पाहुण्यांनी भेट दिली.या विशेष भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारतीय शिक्षणपद्धती आणि आश्रमातील अध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला तसेच विद्यार्थ्यांसोबत पारंपरिक आदिवासी नृत्याचा आनंद घेतला.

विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले.यानंतर त्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत पारंपरिक वेशभूषेत लोकनृत्य,गाणी आणि कला सादर केली. पाहुणेही मोठ्या आनंदाने या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले.विशेष म्हणजे त्यांनी आदिवासी नृत्याची मजा लुटली.
या भेटीदरम्यान पाहुण्यांनी शाळेतील विविध उपक्रम, आश्रमाचे शांत आणि सात्त्विक वातावरण,तसेच ध्यानधारणेच्या माध्यमातून आत्मिक शांतीचा अनुभव घेतला.त्यांना भारतीय शिक्षणपद्धतीतील शिस्त,विद्यार्थ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी केलेले मार्गदर्शन विशेष भावले.
विद्यार्थ्यांसाठीही हा अनुभव संस्मरणीय ठरला.परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीमुळे त्यांना जागतिक संस्कृतीशी जवळून जोडले जाण्याची संधी मिळाली.या भेटीमुळे आत्मा मालिक ध्यानपीठाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक समृद्धीचा अनमोल ठेवा सापडला.
परदेशी पाहुण्यांनी येथे येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि आश्रमाच्या अध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील शिक्षण आणि संस्कृती यांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली. आणि संकुलातील सर्व विद्यार्थी व कर्मचारी वर्ग यांना या भेटीतून नवी प्रेरणा मिळाली असल्याचे कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांनी सांगितले.

