दीपक मोहिते,
बुडाला आग,
पवारांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार ; महाविकास आघाडीमध्ये ” मोडतोड तांबापितळ,” प्रक्रियेला वेग,
काल शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार प्रसंगी शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केल्यामुळे शिवसेनेच्या ( उबाठा ) बुडाला चांगलीच आग लागली आहे.त्यांचे प्रवक्ते खा.संजय राऊत हे शरद पवार यांच्यावर अक्षरशः तुटून पडले आहेत.त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ” महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार,” देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी शरद पवार यांनी शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले.या घटनेनंतर शिवसेना उबाठा गटात तीव्र पडसाद उमटले.सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या अशा वागण्यावर आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केली.या सत्कार सोहळयात पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अक्षरशः स्तुतीसुमने उधळली.ते आपल्या भाषणात म्हणाले,ठाणे,नवी मुंबई,हा संपूर्ण परिसर,नागरी
आहे.या ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांमध्ये माजी नगराध्यक्ष,सावळाराम पाटील,रांगणेकर यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल.नागरी प्रश्नांची जाण असणारे शिंदे हे मोठे नेते आहेत.शरद पवार यांनी शिंदे यांचे केलेले कौतुक उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्या जिव्हारी
लागले.राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावर परखड शब्दात आगपाखड केली.ते म्हणाले,पवार यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे.पण ज्यांनी शिवसेना तोडली,महाराष्ट्राचे तुकडे केले,त्यांच्या सत्कार सोहळ्याला त्यांनी जायला
नको होते.या घटनेने दिल्लीत राजकीय दलाली करणाऱ्यांना खतपाणी घातले गेले.ज्या लोकांनी राज्याचे उद्योगधंदे पळवले,महाराष्ट्राचे तुकडे करण्याची कटकारस्थाने केली,अशांची दलाली करणाऱ्यांचा सत्कार करणे,अत्यंत चुकीचे असून आमच्या हृदयाला अत्यंत वेदना झाल्या.
या सर्व घडामोडीमुळे महाविकास आघाडीमध्ये ” मोडतोड तांबा पितळ,” प्रक्रिया वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे.

