संजय लांडगे,वाडा,
गोऱ्हे येथील शाळेत केंद्रस्तरीय पाककला स्पर्धा संपन्न,
प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत केंद्रस्तरीय पाककला स्पर्धा सोमवारी (दि.१०) वाडा तालुक्यातील गोऱ्हे येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा येथे पार पडल्या.

या स्पर्धेमध्ये तृणधान्यांपासून निर्मित तसेच फॉर्टीफाईड तांदळापासून निर्मित पाककृतींचा समावेश करण्यात आला होता. या पाककला स्पर्धेत पोषण आहार शिजवणाऱ्या महिला तसेच माता पालकांनी सहभाग घेतला होता. केंद्रातील एकूण १५ शाळांनी सहभाग नोंदविला. पाक कला स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.
या स्पर्धेमध्ये चैताली खिलारे शाळा गोऱ्हे यांचा प्रथम क्रमांक आला. भक्ती पाटील शाळा खरिवली को. यांचा द्वितीय तर यशोदा आकरे शाळा भोपिवली यांचा तृतीय क्रमांक आला. विजयी स्पर्धक तसेच सहभागी सर्व सदस्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत केंद्रप्रमुख बाळासाहेब पवार, शिक्षक जनार्दन पाटील, साधना भानुशाली यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गोऱ्हे शाळेतील मुख्यध्यापिका प्रतिज्ञा पाटील, यतीन ठाकरे, भाऊसाहेब बोचरे, अनुष्का चौधरी यांनी मेहनत घेतली. तसेच स्पर्धेच्या वेळी केंद्रातील संतोष सहारे, जयश्री पाटील, ज्योती डोहाळे यांनी उपस्थिती नोंदवली.

