दीपक मोहिते,
थोर समाजवादी नेते मनवेल तुस्कानो यांचा १९ फेब्रु.रोजी अमृतमहोत्सवी गौरव सोहळा,
समाजवाद व गांधीवादाने ओतप्रोत भरलेले निर्भयी व तत्वनिष्ठ,अशी ओळख असलेले मनवेल तुस्कानो यांचा बुध.१९ फेब्रु.रोजी विरार येथे अमृतमहोत्सवी गौरव सोहळा साजरा होत आहे.
गेल्या ५० वर्षांपासून तळागाळातील सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी गल्ली ते दिल्लीपर्यंत अविरत संघर्ष करणाऱ्या या थोर नेत्याचा त्यांच्या जन्मभूमी व कर्मभूमीत होणाऱ्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात मुंबई,पालघर,ठाणे व राज्याच्या विविध भागांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.विरार पश्चिमेस सेंट जोसेफ हायस्कुल मैदान, नंदाखाल येथे सांयकाळी ५.०० वाजता होणाऱ्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वसई प्रांताचे बिशप थॉमस डिसुझा आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले तर विशेष अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया,इ.मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मनवेल तुस्कानो हे समाजवादी मुशीतून राजकारणात आले.गेली ५० वर्षे त्यांनी पाणी,पर्यावरण,वीज,सिडको,एसटी,सीआरझेड कायदा व महानगरपालिकेत ग्रामीण भागातील गावांचा समावेश,इ.ज्वलंत विषयावर आंदोलने केली.त्यांनी आयुष्यात कधीही बेरजेचे राजकारण केले नाही,त्यामुळे त्यांना सत्तेच्या राजकारणापासून पारखे कायम राहावे लागले.स्वच्छ चारित्र्य,मनमिळावूपणा व लढाऊ बाणा,या तीन गुणांमुळे ते नावारूपाला आले.” निर्भय आंदोलन,” या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी सरकार व प्रस्थापित राजकारण्यांना सळो की पळो करून सोडले होते.सरपंच,पंचायत समिती सदस्य,बँकेचे संचालक व अध्यक्ष,अशा विविध जबाबदाऱ्या पेलणारे मनवेल तुस्कानो येत्या १९ फेब्रु.रोजी पंच्याहत्तरीत पदार्पण करत आहेत.अशा या थोर विभूतीला ” news27.in media,” परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा….

