दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
सत्तेचा मुकुट हा काटेरी असतो…..
सत्तेचा मुकुट किती काटेरी असतो,याचा अनुभव वसई व नालासोपारा विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांना पावलोपावली घ्यावा लागत आहे.वसईच्या आ.स्नेहा दुबे यांची एक व्हिडियो क्लिप माध्यमावर व्हायरल झाली आहे.या क्लिपमध्ये आ.दुबे या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मानभावी सल्ला देत असताना पाहायला मिळाल्या.त्यांची ही विनंती मनपाचे अधिकारी मनावर घेतात का त्याला केराची टोपली दाखवतात,हे काही दिवसात स्पष्ट होईल.
त्या ऑडिओ क्लिपमध्ये आ.दुबे आपल्या कार्यक्षेत्रात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,त्यामध्ये गटारे,पाणी,आरोग्य व अन्य समस्यांचा समावेश असून अधिकाऱ्यांनी याविषयी लक्ष घालून प्रश्न सोडवायला हवेत,अशी विनंती करताना पाहायला मिळाल्या.पण गेंड्याची कातडी पांघरलेले मनपाचे अधिकारी,त्यांच्या या विनंतीला मान देतात की केराची टोपली दाखवतात,हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.दुसरीकडे नालासोपाऱ्यांचे आ.राजन नाईक,हे मात्र महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या गैरकारभार विरोधात सखोल चौकशी करण्यात यावी,अशी मागणी करणारी निवेदने देत आहेत.एक आमदार विकासकामे करण्यासंदर्भात विनंती करतो,तर त्याच पक्षाचा दुसरा आमदार चौकशीची मागणी करतो,हा एकप्रकारे परस्पर विरोधाभास असून तो करदात्यांच्या समजण्यापलीकडचा आहे.
वास्तविक नालासोपारा श्रीविजयलक्ष्मी नगर येथील ४१ अनधिकृत इमारतीमधील बेघर रहिवाशांच्या प्रश्नी या दोन्ही आमदारांनी आयुक्त,अति.आयुक्त व उपायुक्त यांना धारेवर धरायला हवे होते.पण या दोघांनी सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असून आम्ही काही करू शकत नाही,असे सांगत या बेघर रहिवाशांच्या तोंडाला पाने पुसली.
महानगरपालिकेच्या एका प्रभारी सहा.आयुक्ताने नुकत्याच व्हायरल झालेल्या एका क्लिपमध्ये महानगरपालिकेत सुरू असलेला भ्रष्टाचार व बजबजपुरीचे विदारक चित्र सर्वांसमोर उभे केले. अशावेळी लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेतात,हे करदात्यांच्या मनाला न पटणारे आहे.पूर्वी सत्तेत असलेल्या लोकांविरोधात गरळ ओकणारे,सतत आंदोलन करणारे व मोर्चे काढणाऱ्या या मंडळीने पेल्हार,कामण व चिंचोटी भागात सध्या कोण वसुली करत आहे ? याचा शोध घ्यावा,अशी तमाम करदात्यांकडून या आमदारांना विनंती करण्यात येत आहे.बघूया,हे आमदार काय करतात ते,लोकांना परिवर्तनाची साद घालत सत्तेत आलेले,हे लोकप्रतिनिधी तुमच्या – आमच्या विश्वासाला किती पात्र ठरतात,तेही लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे.

