” टग्या, ”
फडणवीस – राज यांची भेट ही राजकीयच…..
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,हे काल सकाळी अचानकपणे नाश्ता करण्यासाठी राज ठाकरे यांच्या दरबारी दाखल झाले.नाश्ता करता करता त्यांनी तब्बल एक तास एकमेकांची विचारपूस केली.यावेळी त्यांनी या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,ही भेट केवळ सदिच्छा भेट,अशा स्वरूपाची होती,हे सांगायला मुख्यमंत्री फडणवीस विसरले नाहीत.
” नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर राज यांनी माझे अभिनंदन केले होते.त्यांचे आभार मानण्यासाठी मी आज त्यांना भेटायला गेलो,या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,” असे फडणवीस यांनी माध्यमाना सांगितले.पण त्यांच्या या दाव्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही.ही भेट मुळात सदिच्छा नव्हे तर राजकीय भेटच होती.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे व शिंदे गटाचे सदा सरवणकर या दोघांचा माहीम विधानसभा मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीत शिवसेनेच्या ( उबाठा ) नवख्या उमेदवाराकडून पराभव झाला होता.त्यामुळे राज ठाकरे यांनी महिनाभर स्वतःला माध्यमापासून दूर ठेवले होते.या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या मुलाला सत्तेच्या राजकारणात लॉंच करण्याचा त्यांचा प्रयत्न होता,पण तो मतदारांनी उधळून लावला.त्याचबरोबर त्यांच्या पक्षाचीही निवडणुकीत धुळदाण उ
झाली.या सर्व पार्श्वभूमीवर या दोघांच्या भेटीला खूप महत्व आहे.अमित ठाकरे याला मागच्या दाराने विधान परिषदेवर निवडून आणण्यासाठी आता प्रयत्न होत आहेत.त्यासाठी फडणवीस हे त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले,हे आता लपून राहिलेले नाही.लोकसभेला महायुतीला पाठिंबा देणारे व विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात उमेदवार उभे करणाऱ्या राज ठाकरे यांची राजकीय भूमिका ही गेल्या काही वर्षांपासून सतत हेलकावे खात आहे.मात्र आपल्या सरकारला ” न्यूसन्स व्हॅल्यू,” ठरणाऱ्या पक्षाला एखादी जागा देऊन वेसण घालणे शक्य होत असेल तर भाजप ती संधी सोडत नाही.त्यामुळे अमित ठाकरे हे राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य होतील,अशी शक्यता आहे.आपल्या राजकीय ताकदीचा अंदाज नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाल्यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय भूमिका बदलली आहे.त्यांच्या अशा सततच्या निसरड्या भूमिकेमुळे त्यांच्या पक्षाला मात्र कधीही भरून न येणारे नुकसान सोसावे लागत आहे.पण सत्तेपुढे शहाणपण नाही,हेच खरं…

