भूषण वर्तक, केळवे – पालघर,
लोकप्रतिनिधी प्रशिक्षण व महिला मेळाव्याचे उत्साहपूर्ण आयोजन,
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे पारोळ १ येथे लोकप्रतिनिधी प्रशिक्षण व महिला मेळावा उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून महिलांना सशक्त करण्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास आशा चव्हाण जि.प.सदस्य,गीता पाटील माजी सभापती व पं.स. सदस्य,रमा किणी नगरसेविका,यज्ञा पाटील उपसरपंच, रवींद्र पाटील माजी उपसरपंच,कविता भूयाळ,ग्रा.प.सदस्य तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी,बालविकास अधिकारी,पर्यवेक्षिका आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या मेळाव्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध योजना,महिलांसाठी कायदा,( पोसो ) मोबाईल व इंटरनेट वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.महिलांच्या सक्षमीकरणासाठी व तंत्रज्ञानाच्या योग्य उपयोगाबाबत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान ” सख्य,” संस्थाच्या शालीनी जाधव, चाईल्ड हेल्थ फाउंडेशनच्या मेरी वनमाळी,तसेच प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी व बीट पर्यवेक्षिका दीपा जाधव यांनी महिलांना सशक्तीकरणाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या अखेरीस महिलांना प्रेरणादायी संदेश देणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.विशेषत: स्री भ्रूणहत्या विरोधातील जनजागृतीसाठी कु.कृतिका पाटील हीने सादर केलेली नाटिका उपस्थितांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
या मेळाव्यात बालगोपाळ, सेविका,मदतनीस तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महिला सशक्तीकरण व जनजागृतीच्या दृष्टीने हा उपक्रम यशस्वी ठरला असून, अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

