जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन,
आदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने आज रेड सोईल हॉटेल,जव्हार येथे कार्यशाळा पार पडली.सहा. जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी करिष्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टिके,पोलीस निरीक्षक किशोर मानभाव,राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण अमित मोतीराम भोये, टीटीएसएफ पालघर जिल्हाध्यक्ष विलास बेलकर, लेखक व आदिवासी साहित्यिक चंद्रकांत घाटाळ, मास्टर ट्रेनर दिलीप राठोड आणि पेसा व्यवस्थापक मनोज कामडी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रांतिकारक प्रतिमापूजन करून करण्यात आले.
सदर कार्यशाळेत विविध तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले.
पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांनी सायबर गुन्हेगारी,वाहतूक नियम आणि अपघात प्रतिबंध याविषयी माहिती दिली.
चंद्रकांत घाटाळ यांनी साहित्य चळवळ आणि अवकाश निरीक्षण केंद्र यावर मार्गदर्शन केले.मनोज कामडी यांनी शिक्षणाचे महत्त्व,आर्थिक नियोजन आणि जीवनातील संधी यावर प्रेरणादायी भाषण केले.
विलास बेलकर यांनी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व आणि टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती याविषयी माहिती दिली.
दीपक टिके यांनी आदिवासी विकास विभागाच्या योजना आणि नोकरीच्या संधी यावर मार्गदर्शन केले.
मास्टर ट्रेनर दिलीप राठोड यांनी व्यक्तिमत्त्व विकास यावर सखोल मार्गदर्शन केले.
राज्यसेवा परीक्षा २०२३ उत्तीर्ण अमित मोतीराम भोये यांनी त्यांचा यशस्वी जीवनप्रवास,अभ्यासक्रम आणि मुलाखत तंत्र यावर विद्यार्थ्यांना माहिती दिली.
अँड.भावना आहेर यांनी बालविवाह प्रतिबंध कायदा, पोक्सो कायदा आणि महिलांसाठी विविध कायदे यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यशाळेच्या शेवटी निवडक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गृहपाल प्रवीण ठाकरे,महिला गृहपाल पुष्पा जाधव आणि कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

