दीपक मोहिते,
अरविंद केजरीवाल यांचा गड जमिनदोस्त,पक्षाचे दिग्गज नेते पराभूत,
आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा प्रवेश वर्मा यांनी अटीतटीच्या लढतीत ३ हजार १८२ मतांनी पराभव केला.प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे चिरंजीव असून त्यांनी यापूर्वी २०१५ व २०२० च्या निवडणुकीत बाजी मारली होती.या निवडणुकीत त्यांनी केजरीवाल यांचा पराभव करत हॅटट्रिक साधली आहे.
अरविंद केजरीवाल सह मनीष सिसोदिया,सत्येंद्र जैन,सोमनाथ भारती,सौरभ भारद्वाज व अवध ओझा, या सहा दिग्गज उमेदवारांना दिल्लीच्या मतदारांनी धूळ चारली.त्यांच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी या कशाबशा जिंकल्या.गेल्या निवडणुकीत ६२ जागा जिंकणाऱ्या आम आदमी पार्टीची गाडी २३ जागांवर अडखळली.या लढतीत भाजपने मात्र ८ जागांवरून थेट ४७ जागांवर झेप घेतली.कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्ली जिंकायचीच,अशा इर्षेने उतरलेले भाजपचे वरिष्ठ नेते,पदाधिकारी,उमेदवार व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये स्वतःला झोकून दिले.त्यामुळे भाजप आम आदमी पार्टीची प्रचारात चांगलीच कोंडी करू शकली.भाजपच्या प्रचारात शिस्त,प्रचाराची पद्धतशीर आखणी,बूथ कमिटी समन्वय व सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची यशस्वी रणनिती,अशी कामगिरी पार पडल्यामुळे केजरीवालाचा हा गेली पंधरा वर्षे अभेद्य असलेला गड पत्यासारखा कोसळला.निकालानंतर अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांसमोर येऊन आपला पराभव मान्य केला व विरोधी पक्ष म्हणून आम्ही योग्य भूमिका पार पाडू,अशी प्रतिक्रिया दिली.हरियाणा,महाराष्ट्र व दिल्ली या तिन्ही राज्यात विरोधकांचा दारुण पराभव झाल्यामुळे विरोधी पक्षांचे अवसान पार गळून पडले आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची या निवडणुकीत पार ठिकऱ्या उडाल्यामुळे त्यांच्याकडे असलेले इंडिया गटाचे आता कर्णधारपद हिसकावले जाण्याची शक्यता आहे.

