सुरेश काटे,तलासरी,
यशराज रिसर्च फाऊंडेशनतर्फे अणवीर – तलासरी येथे स्तुत्य उपक्रम,
यशराज रिसर्च फाऊंडेशनने २०२१ मध्ये तलासरी तालुक्यातील ” अणवीर,” हे गाव आदर्श गाव बनवण्यासाठी दत्तक घेतले आहे.गावाला आदर्श बनवण्यासाठी संस्थेने शिक्षण, शेती,रोजगार,उपजीविका, युवक आणि महिला सक्षमीकरण,या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार त्यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून लहान मुले, युवक-युवती,महिला,शेतकरी आणि कामगार यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले.त्यातून त्यांनी त्यांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न चालवला आहॆ.गावातील शाळांचा चेहरा – मोहरा बदलून शाळांमध्ये अत्याधुनिक सर्व सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. मुलांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. गावातील महिला,युवक आणि शेतकरी यांच्यासाठी उपजीविकेची साधने उपलब्ध करून,वेगवेगळी प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक पाठींबा देण्यात आला आहॆ.
संस्थेने गावातील नागरिकांच्या सहभागातून आणि शासनाच्या सहयोगातून रस्ते,पूल,बंधारे इ. अनेक विकासकामे केली.आधुनिक पद्धतीने शेती आणि शेतीला पूरक असणारे व्यवसाय सुरु करण्यासाठी संस्था सर्व शेतकऱ्यांना मदत करत आहे. गावांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने होत असलेले काम पाहून गावातील अनेक लोक सध्या फाउंडेशनच्या कार्याला साथ देत आहेत.
या फाउंडेशनतर्फे राबवण्यात येणाऱ्या कामाची यशराज बायोटेक्नोलॉजी लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अणवीर गावाला भेट देऊन संस्थेच्या पुढाकारांची आणि कामांची पाहणी केली. त्यामध्ये गावात तयार झालेले रस्ते,पुल,बंधारे,शेळीपालन व्यवसाय,कुक्कुटपालन व्यवसाय,महिला सशक्तीकरण उपक्रम,दुबार पीक,जैविक खते प्रकल्प,पालघर जिल्ह्यात आलेली पहिल्या क्रमांकाच्या शाळेची कामगिरी,इ.चा समावेश होता.त्यांनी थेट गावातील शेतकऱ्यांशी आणि महिलांशी संवाद साधला. त्यांचा आत्मविश्वास,कामगिरी आणि अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी यशराज रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित केलेल्या स्थानिक खेळांमध्ये ( लगोरी, विटी – दांडू, सुरफट्या,कोंबड झुंज, क्रिकेट ) गावकरी सहभागगी झाले होते.वेगवेगळ्या खेळांमध्ये उत्साहाने सहभागी होऊन गावकऱ्यांनी आणि यशराज बायोटेकनॉलॉजी लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे आनंद लुटला.यावेळी अणवीर गावचे सरपंच नरेश शिंगडे, जि. प. प्रा.शाळा,अनवीर दाभलीपाडा शाळेचे मुख्याध्यापक दीपक अहिरराव,यशराज रिसर्च फाउंडेशनचे प्रोग्राम लीड नामदेव गुलदगड आदी मान्यवर उपस्थित होते.

