वसंत भोईर,वाडा
वाड्यात जिजाऊ संघटनेला खिंडार,नेते डाॅ.गिरीश चौधरी व शशिकांत पाटील यांचा भाजपात प्रवेश,
जिजाऊ संघटनेचे नेते डाॅ.गिरीश चौधरी व शशिकांत पाटील यांनी आपल्या शेकडो सर्मथकांसह आज भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते बोईसर येथे झालेल्या एका कार्यक्रमात भाजपात प्रवेश घेतला. या प्रवेशाने जिजाऊ संघटनेला मोठा धक्का दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डाॅ गिरीश चौधरी, शशिकांत पाटील हे जिजाऊ संघटनेच्या स्थापनेपासून सक्रीय होते.चौधरी यांच्यावर भिवंडी लोकसभा उपाध्यक्ष तर पाटील यांच्यावर पालघर लोकसभा क्षेत्र उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती.या काळावधीत त्यांनी संघटनेत महत्वाची कामगिरी बजावून ते संघटनेत ताईत बनले होते.गिरीश चौधरी यांनी कुडूस ग्रामपंचायतीत आपली सत्ता प्रस्थापित करून काही काळ ते उपसरपंच पदी विराजमान झाले होते.तर शशिकांत हे पालसई गटातून जि.प.सदस्य पदी निवडून आले होते.लढाऊ युवा नेते म्हणून ते तालुक्यात ओळखले जातात.त्यांच्या सोबत कुडूसचे सरपंच राजेंद्र कोंगील, गुंजच्या सरपंच प्रियंका पाटील,डाकिवलीच्या सरपंच दिपाली बंदरे,वसुरीचे सरपंच दिलीप भिमरी, सारशीचे सरपंच दिनेश कोदे, डोंगस्ते उपसरपंच प्रशांत मेणे,चिंचघर ग्रामपंचायतीचे सदस्य कैलास ठाकरे अशा ११६ सर्मथकांनी भाजपात प्रवेश केल्याने जिजाऊ संघटनेला धक्का दिला आहे.
पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा मनोदय दोघांनी बोलून दाखवला आहे.
दरम्यान,आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा प्रवेश केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

