दीपक मोहिते,
निवडणूक निकाल ; विश्लेषण,
दिल्ली विधानसभा निवडणूक ; भाजपची प्रचंड विजयाच्या दिशेने मुसंडी,
अपेक्षेप्रमाणे भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आहे.आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासून भाजपने आघाडी घेतली होत, ती शेवटपर्यंत त्यांनी टिकवून धरली.या लढतीत आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनाही चढउतार पाहावे लागले.सकाळी ११.०० वाजपर्यंत भाजप – ४३,आम आदमी पार्टी – २७ व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ०,असे बलाबल निर्माण पाहायला मिळाले.
दिल्ली विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अनेक एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांनी दिल्लीची सत्ता भाजपच्या ताब्यात जाईल,असा अंदाज व्यक्त केला होता.तो आज झालेल्या मतमोजणीत तंतोतंत खरा ठरला आहे.भाजपच्या विद्यमान
मुख्यमंत्री आतिशी या देखील पिछाडीवर पडल्या होत्या.माजी शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया हे देखील सुरुवातीला काही काळ पिछाडीवर पडले होते, पण त्यानंतर ते सावरले गेले.ज्या पंजाबी,मुस्लिम व शीख समाजाने गेल्या तीन निवडणुकीत आम आदमी पार्टीला डोक्यावर घेतले होते,त्या समुदायानी या निवडणुकीत आम आदमी पार्टीला अस्मान दाखवले.गेल्या १२ ते १५ वर्षात केजरीवाल यांनी शिक्षण,पायाभूत सोयी-सुविधा,आरोग्य व महिला कल्याण क्षेत्रात जी विकासकामे केली,ती नक्कीच कौतुकास्पद होती,पण त्यांच्या सरकारने मद्य धोरणात केलेले बदल,दिल्लीचे वाढते प्रदूषण व त्यांच्या नेत्यांना विविध कारणावरून झालेला कारावास,इ.बाबी त्यांना त्रासदायक ठरल्या.तसेच इंडिया आघाडीत आम आदमी पार्टी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे दोन्ही पक्ष घटक पक्ष असूनही या निवडणुकीत ते एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहिले,त्याचा फायदा भाजपला झाला.राष्ट्रीय राजकारणात या दोन्ही पक्षानी स्विकारलेल्या विसंगत भूमिकांमुळे दोन्ही पक्ष या निवडणुकीत भुईसपाट झाले.संपूर्ण निकाल अद्याप हाती आले नसले तरी भाजपने प्रचंड विजय मिळवण्याच्या दृष्टीने जोरदार मुसंडी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

