संजय लांडगे,वाडा,
जवाहर नवोदय विद्यालयांचे शिक्षक व कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी- डॉ.सवरा,
खा.हेमंत विष्णु सवरा यांनी संसदेत नियम ३७७ अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पेन्शन मागणीचा मुद्दा प्रभावीपणे मांडला.यावेळी खा.सवरा म्हणाले,मी स्वतः जवाहर नवोदय विद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्यामुळे,या विद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांशी माझा सतत संवाद असतो. संपूर्ण देशभरात ५९० नवोदय विद्यालये कार्यरत आहेत आणि येथे कार्यरत असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळावा,ही त्यांची जुनी आणि न्याय्य मागणी आहे.
जवाहर नवोदय विद्यालय हे केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत असलेले स्वायत्त संस्थान आहे.येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी केंद्रीय नागरी सेवा ( पेन्शन ) नियम, १९७२ अंतर्गत पेन्शनसाठी मागणी केली आहे.मात्र,हा विषय शिक्षण मंत्रालयात अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
केंद्रीय तिबेटी शाळा,राष्ट्रीय मुक्त विद्यालय,इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आणि अन्य स्वायत्त संस्थांमधील कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ दिला जातो,मात्र जवाहर नवोदय विद्यालयांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांना अद्याप हा लाभ मिळालेला नाही,ही बाब अन्यायकारक आहे.
देशाचे शिक्षणमंत्री सकारात्मक विचार करणारे मंत्री आहेत.त्यामुळे या पेन्शन मागणीवर त्वरित पुनर्विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी खा.डॉ.हेमंत सवरा यांनी संसदेत केली.

