दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
फोर्ब्सच्या यादीत भारताला पहिल्या दहामध्ये स्थान नाही,
अमेरिका,चीन,रशिया,फ्रांस नंतर महासत्ता होण्याची स्वप्न पाहणाऱ्या आपल्या देशाला यंदा फोर्ब्स – २०२५ यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळू शकलेले नाही.नेतृत्व,आर्थिक क्षमता,राजकीय शक्ती,लष्करी ताकद व आंतरराष्ट्रीय संबंध,या निकषावर आपला देश खरा उतरला नाही,त्यामुळे आपण बाराव्या क्रमांकावर फेकलो गेलो आहोत.या घडामोडीमुळे भारताला चांगलाच झटका बसला आहे.

फोर्ब्सने जगातील शक्तिशाली राष्ट्राच्या नावाची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे.अमेरिकेने भक्कम अर्थव्यवस्था ( ३०.३४ ट्रीलीयन डॉलर्स व लोकसंख्या – ३४.५ कोटी,) व लष्करी ताकद या बळावर आपले अव्वल स्थान टिकवुन धरले आहे.तर चीनने ( १९.५३ ट्रीलीयन डॉलर्स व लोकसंख्या – १४१.०९ कोटी,) निर्यात,रोजगारनिर्मिती व लष्कर/आर्थिक क्षमता या जोरावर रशियाला तिसऱ्या क्रमांकावर ढकलण्यात यशस्वी ठरला आहे.ऊर्जा,नैसर्गिक साठे असलेला पण युक्रेनसमवेत सुरू असलेल्या युद्धामुळे आर्थिकदृष्ट्या काही प्रमाणात कमकुवत झालेला रशिया ( २.२ ट्रीलीयन व लोकसंख्या – १४.०३ कोटी,) आता तिसऱ्या क्रमांकावर विसावला आहे.गेल्या काही वर्षात आर्थिक,उद्योगधंदे वाढ,रोजगारनिर्मिती क्षेत्रात डगमगणाऱ्या ब्रिटनला ( ३.७३ ट्रीलीयन डॉलर्स व लोकसंख्या – ६.९१ कोटी ) चौथे स्थान मिळाले आहे.त्यानंतर जी-७ देशाच्या संघटनेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या जर्मनीने ( ४.१२ ट्रीलीयन व लोकसंख्या – ८.४५ कोटी,) पाचवा क्रमांक पटकावला आहे.या देशाने जडउद्योग क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली.त्यानंतर द.कोरिया,फ्रांस,जपान,
सौदी अरेबिया व इस्त्रायल या पाच देशाचा नंबर लागला आहे.आपला देश या क्रमवारीत बाराव्या क्रमांकावर घसरला आहे.या सर्व देशाच्या जीडीपीच्या तुलनेत आपण सरस असलो तरी निर्यात,व्यापार,
रोजगारनिर्मिती व ग्रामीण भागाचा विकास,या क्षेत्रात आपल्या देशाची कामगिरी गेल्या दोन कामगिरी नगण्य राहिली.

