सुशील जोशी,पालघर
पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न,
पालघर जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करताना पालघर जिल्ह्यातील सर्व विकास यंत्रणांनी लोकोपयोगी कामे तातडीने करावीत.अशा सूचना वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित शासकीय अधिकारी यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिल्या.
वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक काल सकाळी ११.०० वाजता लोकशाहीर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे झाली.सदर बैठकीस जि.प.अध्यक्ष प्रकाश निकम,खा.सुरेश म्हात्रे,आ.ॲड.निरंजन डावखरे,आ.राजेंद्र गावित, आ.दौलत दरोडा,
आ.विलास तरे,आ.विनोद निकोले,आ.हरिश्चंद्र भोये, आ.स्नेहा दुबे-पंडित,आ. राजन नाईक, जिल्हाधिकारी गोविंद बोडके,पोलीस आयुक्त मिरा-भाईंदर, वसई-विरार मधुकर पाण्डेय,अति. आयुक्त एमएमआरडीए राधाबिनोद शर्मा,जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, वसई-विरार महानगरपालिका आयुक्त अनिलकुमार पवार, प्रकल्प अधिकारी डहाणू सत्यम गांधी,प्रकल्प अधिकारी जव्हार करिश्मा नायर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे तसेच जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस १८ जुलै व २७ जुलै २०२४ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्तास मंजुरी देण्यात आली.जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण,विशेष घटक योजना व आदिवासी घटक कार्यक्रम सन २४ – २०२५ चा जाने.२०२५अखेर खर्चाचा आढावा घेण्यात आला. सन २४ – २०२५ अंतर्गत अनुक्रमे रु.३४५ कोटी,रु.१४ कोटी,रु.३२९.५० कोटी,असा एकूण रु.६८८.५० कोटी निधी अर्थसंकल्पित झाला. एकूण रु. ५६७.५३ कोटी रु.ला प्रशासकिय मान्यता देण्यात आल्या.तसेच रु.१८२.५५ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. सन २४- २०२५ अंतर्गत उर्वरित निधी खर्च करण्यासंदर्भात पालकमंत्री गणेश नाईक यांनी यंत्रणांना निर्देश दिले.
तसेच जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, विशेष घटक योजना व आदिवासी घटक कार्यक्रम सन २५ – २०२६ करिता अनुक्रमे रु.२७१.६५ कोटी, रु.१४.०० कोटी,रु.४१०.४३ कोटी असा एकूण रु.६९६.०८ कोटीची मर्यादा शासनाकडून प्राप्त झाली आहे.त्याअनुषंगाने जिल्ह्यातील विविध कार्यान्वयीन यंत्रणांकडून प्रस्ताव प्राप्त करून निधीच्या मर्यादेत आराखडा जिल्हा नियोजन समिती बैठकीत सादर करून आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच सर्वसाधारण योजनेंतर्गत रु.१९६.०० कोटी व आदिवासी उपयोजनेंतर्गत रु.७२.८३ कोटी असा एकूण रु.२६८.८३ कोटी अतिरिक्त निधीची मागणी जिल्हा नियोजन समिती,पालघरतर्फे राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या निती आयोगा अंतर्गत आकांक्षित तालुका कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील डहाणू,तलासरी,जव्हार, विक्रमगड हे चार तालुके समाविष्ट करण्यात आले असून,जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २४ – २०२५ अंतर्गत प्रती तालुका रु.५.०० कोटी असा एकूण रु.२०.०० कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून, सदर निधीच्या अनुषंगाने चारही तालुक्यांनी आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सादर करून आराखड्यास मंजूरी देण्यात आली.
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्ह्यातील विविध यंत्रणांद्वारे कार्यान्वयीत वैयक्तिक लाभांच्या योजनेचे पुस्तक तयार करून सदर पुस्तीकेचे अनावरण करण्यात आले. जिल्हा नियोजन समिती पालघरतर्फे महाराष्ट्रात प्रथमच वैयक्तिक लाभाच्या योजनांचे पुस्तक तयार करण्यात आले आहे.त्यामुळे नागरिकांना विविध विभागांतर्गत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण, विशेष घटक योजना व आदिवासी घटक कार्यक्रम) सन २५ – २०२६ अंतर्गत महत्वाच्या योजनांकरिता प्रस्तावित निधी पालघर जिल्ह्यांतर्गत असलेल्या महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत यांचा विकासाकरिता एकूण रु.८८.५८ कोटी,पालघर जिल्ह्यांतर्गत असलेल्या सर्व पेसा ग्रामपंचायतींना पायाभुत सुविधा,वनहक्क अधिनियम, पेसा कायद्याच्या अंमलबजावणी,आरोग्य स्वच्छता शिक्षण व वन्यजीव संवर्धन या करिता ५ % अबंध निधी रु.५९.३६ कोटी,सर्वसाधारण अंतर्गत ग्रामपंचायतींच्या विकासासाठी जनसुविधा व नागरीसुविधा अंतर्गत रु. १४.५० कोटी पालघर जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्याकरिता डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम अमृत आहार तसेच अंगणवाडी बांधकाम व दुरुस्तीकरीता महिला व बालविकास विभागाकरिता एकूण रु.४८.१५ कोटी पाटबंधारे विकासाकरिता एकूण रु.३८.६५ कोटी, जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते १० वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची गळती थांबवण्यासाठी प्रोत्साहनपर सुवर्ण महोत्सव शिषवृत्ती तसेच सर्वसाधारण अंतर्गत शाळा दुरुस्ती व नविन वर्ग खोल्या बांधकामाकरिता एकूण रु. ६८.०६ कोटी,ऊर्जा विकासाकरिता रु.९.५८ कोटी,आरोग्य विभागाकरिता सर्वसाधारण अंतर्गत रु.१६.७५ कोटी व आदिवासी उपयोजने अंतर्गत रु.५०.३३ कोटी असा एकूण रु.६७.०८ कोटी निधी जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य अधिकारी जि.प. पालघर,जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण ) अंतर्गत रस्ता सुधारणा व जेटीची लांबी वाढवण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ कार्यालयाकरिता एकूण रु. १०.५० कोटी,कृषी विकासाकरिता रु.२३.८३ कोटी,गड किल्ले योजने अंतर्गत किल्ल्याच्या जतन दुरुस्ती व संवर्धनाच्या कामासाठी ८.१५ कोटी, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत पोलीस व तुरुंग या विभागाच्या आस्थापनांमध्ये पायाभुत सुविधा पुरविणे आणि सीसीटीव्ही संनिरीक्षण यंत्रणा व इतर उपयुक्त तंत्रज्ञान पुरविणे करिता एकूण रु.८.१५ कोटी मंजूर करण्यात आला आहे,पालघर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय विकासाकरिता रु.४.८० कोटी रु.मंजूर करण्यात आले आहे.

