दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
धर्मसत्ता व राजसत्ता यांची युती अराजकाला आमंत्रण देणारी…
धर्मसत्ता व राजसत्ता यांची युती होते,तेंव्हा स्वतंत्रपणे विचार करणे,किंवा विवेकाने काही करता येत नाही.कारण,अशावेळी केवळ धर्मभावनेला महत्व आलेले असते आणि हीच भावना जनसमूहाच्या मनावर राज्य करत असते.मात्र या लोकांमध्ये समोरासमोर लढण्याची क्षमता नसते.मात्र रयतेला आपल्या ताब्यात ठेवण्याची प्रचंड ताकद त्यांच्यामध्ये असते.सर्वसामान्य माणसाला पाप-पुण्य व स्वर्ग-नरक,अशा विक्षिप्त कल्पनांच्या जाळ्यात बंदिस्त करणे सहजशक्य असते.हीच युती जनमानसात भयगंड निर्माण करते.आज जगातील अनेक देशात सर्वत्र हेच सुरू आहे.
काही वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांनाही पाकिस्तानच्या राजसत्तेने जन्नत मिळेल,असे गाजर दाखवत हल्ल्याचा कट रचला होता.या हल्ल्यानंतर आपल्याला मायदेशी परतता येणार नाही,हे माहीत असूनही या दहशतवाद्यानी कामगिरी फत्ते केली.असाच प्रकार न्यूयॉर्कच्या ट्वीन टॉवर वरील हल्ल्यातील अतिरेक्यांचे धर्मसत्तेने ब्रेनवॉश केले होते.आज एका विशिष्ट समाजात या सर्व दहशतवाद्यांना ” जिहादी,” म्हणून स्थान मिळाले आहे.या अशा कामातून थेट जन्नतचे दरवाजे उघडले जातात,हे त्यांच्या मनावर बिंबवण्यात त्या देशाची राजसत्ता व धर्मसत्ता यशस्वी होऊ शकली यावरून आपण लक्षात घ्यायला हवे की धर्मसत्तेत किती ताकद व क्षमता असते.या दोन घटनांनी जनमानसाला आपल्या हातातील खेळणे बनवण्याची क्षमता व कौशल्य या दोन्ही सत्तेत असते,हे स्पष्ट होते.धर्मसत्तेला हाताशी धरून राजसत्ता,जुलमी सत्ता दीर्घकाळ राबवू शकते.इतिहासाची पाने उलटून पाहिली तर जगभरातील अनेक साम्राज्यानी अशा पद्धतीने सत्ता राबवल्याचे आपल्याला पाहायला मिळेल.आज अनेक मुस्लिम राष्ट्रामध्ये हेच चालले आहे.त्यासाठी ही युती धर्ममार्तंडाना हाताशी धरत असते.अशा पद्धतीच्या राजकारणाला समाजवादात थारा मिळत नाही.पण २१ व्या शतकात अमर्याद सत्ता व तीही दीर्घकाळ राबवण्यासाठी या दोन्ही सत्ता,आपण हातात हात घालून काम केले पाहिजे,अशा निर्णयाप्रत आले व जगभरात धर्मासत्ता व राजसत्ता यांचे साटेलोटे निर्माण होऊ लागले.पण कालांतराने हीच धर्मसत्ता, राजसत्तेला जुमानत नाही.त्यावेळी राजसत्तेला आलेली धुंदी उतरते व त्यांचा बंदोबस्त करावा लागतो,पण वेळ निघून गेलेली असते.सौदी अरेबियात काही महिन्यांपूर्वी जे काही घडले,त्यावरून प्रत्येक देशाने धडा घ्यायला हवा.

