अनिल वैद्य,नाशिक,
अंमलीपदार्थ विक्री विरोधात कठोर कारवाई करावी – गृहराज्यमंत्री योगेश कदम,
अंमली पदार्थ विक्रेत्यांबरोबरच सेवन करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करतानाच याविरोधात शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी.त्यामध्ये पालकांना सहभागी करून घ्यावे,असे निर्देश राज्याचे गृह ( शहरे ), महसूल,ग्रामविकास व पंचायतराज,अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी येथे दिले.ते आज नाशिक पोलिस आयुक्तालयात आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव,मोनिका राऊत,चंद्रकांत खांडवी यांच्यासह वरीष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री कदम म्हणाले की, अंमली पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवावे.शहरात कुठेही अंमली पदार्थांची विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी,अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीपर मोहीम राबवताना समाजमाध्यमांचा उपयोग करावा,अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक कारवाईचा नियमितपणे आढावा घेण्यात यावा,अल्पवयीन मुले गुन्हेगारी क्षेत्रात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी,त्यासाठी जनजागृती करावी.ड्रंक ॲण्ड ड्राइव्हचे प्रकार घडू नयेत, म्हणून नियमितपणे तपासणी करावी,सायबर गुन्ह्यांवर लक्ष ठेवावे,तसेच पोलिस दलातर्फे आगामी १०० दिवसांत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी,असे निर्देश राज्यमंत्री कदम यांनी या बैठकीत दिले.पोलिस आयुक्त कर्णिक यांनी या बैठकीत पोलिस दलातर्फे शहरात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

