दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
” कॉमन मॅन,” ते ” डेडिकेटेड कॉमन मॅन,” एक असह्य व जीवघेणा प्रवास,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका जाहीर सभेत म्हणाले, ” मी यापूर्वी कॉमन मॅन म्हणजे सीएम होतो,आता डेडीकेटेड कॉमन मॅन म्हणजे डिसीएम झालो. त्यांच्यावर हा जो असह्य प्रवास करण्याची पाळी आली आहे,ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आणली.त्यामुळे शिंदे
महाशयानी सध्या अमित शहा पुराण वाचणे बंद केले आहे.तसेच त्यांच्या दिल्ली वाऱ्याही आता थांबल्या आहेत.उठसुठ मोदी व शहा यांचे गोडवे गाणारे कॉमन मॅन आता डेडिकेटेड कॉमन होऊन आपल्या दरे गावात आपल्या शेतीमध्ये माती परीक्षण करताना पाहायला मिळत असतात.
आपल्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अनेक योजना यशस्वीपणे राबवणाऱ्या शिंदे यांना विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा आपल्याला मुख्यमंत्रीपद अशी अपेक्षा होती.पण या पदाने त्यांना हुलकावणी दिली व त्यांच्या दिल्ली ऐवजी दरे गावाच्या फेऱ्या सुरू झाल्या.त्यानंतर मंत्रीपदे,मलईदार खाती व आता पालकमंत्री पदे वाटप,या सर्व प्रक्रियेमध्ये त्यांना कायम सावत्र पणाची वागणूक मिळत गेली.त्यांच्या कार्यकाळात त्यांनी लाडकी बहीण योजना यशस्वीरीत्या राबवली,त्यामुळे महायुती पुन्हा सत्तेत विराजमान झाली.पण निवडणूक जिंकल्यानंतर मात्र भाजपने त्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला.निवडणुकीपूर्वी शिंदे यांच्याशिवाय महायुतीचे पान देखील हलत नव्हते,ते शिंदे त्यांच्या दरे गावांतील शेतीमध्ये कचरा दूर करताना पाहायला मिळाले.आज महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून वाद उफाळून वर आला आहे.महाडचे भरत गोगावले हे पालकमंत्री पद मिळावे म्हणून जीवाच्या आकांताने मैदानात लढत आहेत.पण डेडिकेटेड कॉमन मॅन,आपल्या शेतीमध्ये ” आंखो देखा हाल,” पाहत बसले आहेत.आता तर भाजपने शिंदे यांचे विश्वासू सहकारी उदय सामंत यांना कुरवाळायला सुरुवात केली आहे.सामंताचा राजकीय क्षेत्रावर होणारा उदय,हा डेडिकेटेड कॉमन मॅन यांना येणाऱ्या काळात त्रासदायक ठरू शकतो.या सर्व घडामोडीवरून एक बाब प्रकर्षाने जाणवली की ” नियती ही कधीच कोणाला सोडत नाही,”

