नवीन पाटील,सफाळे,
रस्ता सुरक्षा अभियानातून वाहनचालकांमध्ये जनजागृती,
वाहनचालकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने लार्सन अँड टुब्रो लिमिटेड ( एसटीपी-१७ ) प्रकल्प आणि पश्चिम डेडिकेटेड फ्रेंट कॅरिडोर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
काल पालघर तालुक्यातील सफाळे बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर रस्ता सुरक्षा अभियान २०२५ च्या माध्यमातून वाहनचालकांमध्ये विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली.
या अभियानातून दुचाकीस्वारांनी सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर करावा, तसेच दुचाकी व चारचाकी वाहनचालकांनी वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा,सुरक्षात्मक बेल्टचा वापर करावा.अपघाताचा धोका टाळण्यासाठी वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा. वाहतूक कोंडी होऊ नये,यासाठी आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे.नागरिकांनी रहदारीच्या रस्त्यांवरून चालताना विशेष काळजी घ्यावी.वाहन चालवताना मद्यपान करू नये आणि असे कोणी करीत असल्यास तत्काळ याची माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी. रस्ते अपघातांची वाढती संख्या पाहता ती टाळण्यासाठी वाहनचालकांनी वेळोवेळी वाहनांची योग्य देखभाल करूनच वाहने चालवावी.वाहतूक करताना नेहमी सुरक्षात्मक बाबींचा योग्य समयी वापर करावा. भरधाव वाहतूक टाळून रस्त्यावरील वादविवादाचे प्रसंग टाळण्यासाठी सर्वांनीच जबाबदारीने आणि नियमांमध्ये राहूनच वाहने चालवावी.अशा विविध नियमांची आणि सुरक्षात्मक बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या अभियानात लार्सन अँड टुब्रोचे वरिष्ठ अपघात प्रतिबंधक अधिकारी विमल कुमार तिवारी,सुरक्षा पर्यवेक्षक अमित यादव,डीएफसीसीचे सतीश जैन,निलेश कुमार,अनिल सरोदे,महेंद्र ठाकरे आणि वाहतूक विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब यमगर सहभागी झाले होते.

