जव्हार प्रतिनिधी,
शिवम चौधरीचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश : देहेरे आश्रम शाळेचा गौरव,
शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा,देहेरे येथील ११ वीचा विद्यार्थी शिवम विलास चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर शाळेचा आणि देशाचा गौरव वाढवला आहे. अमेरिकेतील ” Kindness Grows हेरे,” संस्थेच्या माध्यमातून आयोजित ” Kids Kindness Project,” मध्ये शिवमने ” From Darkness to लीगत,” हा प्रकल्प सादर केला.या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आदिवासी भागातील मुलांना अभ्यासासाठी सोलर लॅम्प्स उपलब्ध करून देणे,हा आहे.
या प्रकल्पासाठी एकूण २८२ अर्ज आले होते, त्यापैकी फक्त ४७ प्रकल्पांची निवड करण्यात आली.विशेष म्हणजे, भारतातून फक्त शिवमच्या प्रकल्पाची निवड झाली असून,तो या उपक्रमासाठी अनुदान मिळवणारा भारतातील एकमेव विद्यार्थी ठरला आहे.
शिवमच्या या यशामध्ये कैवल्य एज्युकेशन फाउंडेशनच्या सीनियर प्रोग्रॅम लीडर वंदना मौर्या यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.वंदना मौर्या यांनी प्रकल्पासाठी योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.त्यांच्या सहकार्यामुळे शिवमने प्रकल्पासाठी आवश्यक मेहनत घेतली आणि यशस्वीपणे प्रक्रिया पूर्ण केली.
शिवमच्या या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेतील मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षकांनी त्याचा विशेष सत्कार केला.तसेच त्याच्या या यशाबद्दल ग्रामपंचायत वडोलीच्या सरपंच कामिनी गावंढा,उपसरपंच रघुनाथ भोये,सदस्या व ग्रामपंचायत अधिकारी मीरा वाघमारे यांच्या हस्ते शिवम चौधरी व त्याच्या आईचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.तसेच यावेळी वंदना मौर्या यांनाही या यशाबद्दल सन्मानित करण्यात आले. सत्कार समारंभा दरम्यान शिवमने आपले मनोगत व्यक्त केले.त्याने प्रकल्पासाठी मिळालेल्या संधींबद्दल आणि अनुभवांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
वंदना मौर्या म्हणाल्या, ” Kindness Grows Here,” ही संस्था जगभरातील मुलांना सामाजिक बदल घडवण्यासाठी प्रोत्साहित करते.शिवमची निवड,ही त्याच्या परिश्रमाचा गौरव आहे.आम्हाला त्याचा अभिमान आहे.”
शिवम चौधरीच्या या यशामुळे ” देहेरे आश्रम शाळा,” संपूर्ण देशभरात परिचित झाली आहे.त्याच्या यशाचा शाळेसह संपूर्ण जिल्ह्याला अभिमान असून त्याला पुढील प्रकल्पांसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

