नवीन पाटील,सफाळे
इअरफोनचे वेड विद्यार्थीनीच्या जीवावर बेतले…
कॉलेज तसेच शाळकरी तरुण तरुणींमध्ये इअरफोनच्या सहाय्याने गाणी ऐकणे किंवा कॉलवर तासनतास बोलणे,हे फॅड मोठ्याप्रमाणात वाढले असून आता ते त्यांच्या जीववर बेतू लागले आहे.
पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाजवळ असलेल्या रेल्वे फाटकात कानाला इअरफोन लावून फाटक ओलांडणाऱ्या एका विद्यार्थिनीला रेल्वेएक्सप्रेसची धडक बसून आपले प्राण गमवावे लागले.
वैष्णवी रावल राहणार माकणे,सफाळे ( पश्चिम ) असे या मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.वैष्णवी ही सफाळे येथील इंग्लिश माध्यमाच्या शाळेत इयत्ता नववीमध्ये शिकत होती.काल दुपारी एक ते दीडच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे माकणे येथून सफाळे येथील ट्यूशनमध्ये जाण्यास निघाली.कानात इअरफोन घालून ती सफाळे स्थानकाजवळ असलेल्या बंद रेल्वे फाटक ओलांडत असताना इअरफोनमध्ये मग्न असणाऱ्या वैष्णवी हीला मुंबई दिशेने येणाऱ्या एक्सप्रेस गाडीची जोरदार धडक बसली. या अपघातात तीचा जागीच मृत्यू झाला.सायंकाळी सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.वैष्णवी ही आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती.तिच्या अशा अपघाती मृत्यूमुळे पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बॉक्स कोट…
काही महिन्यांपूर्वी नालासोपारा येथील एका तरुणाचा देखील इअरफोनच्या नादात अशाच प्रकारे सफाळे स्थानकात दुर्दैवी मृत्यू झाला होता.रेल्वे कर्मचारी तसेच रेल्वे पोलीस प्रवाशांनी लोकांनी रेल्वे ट्रॅक क्रॉस करू नये, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात.पण नागरिक जुमानत नाहीत.तर दुसरीकडे स्थानकात प्रवाशांसाठी पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने दैनंदिन प्रवाशांना नाहक जीव मुठीत घेऊन रेल्वे रूळ ओलांडून येजा करावी लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहॆ.

