मनिष धानू,डहाणू,
डहाणू – सायवन येथे महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम,
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत सायवन येथे महिला मेळावा उत्साहात पार पडला.
जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी,डहाणू पंचायत समिती सभापती प्रविण गवळी पंचायत समिती सदस्य पिंटी बोरसा,रायपूर सरपंच प्रकाश जाधव, सायवन प्रा.आ.केंद्राचे डॉ. राठोड,उपसरपंच विलास गिंभल तसेच ग्रामपंचायत सदस्य व विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला.
यावेळी महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच आरोग्य व बालविकास विषयक मार्गदर्शन करण्यात आले.महिलांना विविध योजनांची माहिती देऊन त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. बालविवाहाचे दुष्परिणाम व कमी वयात लग्न न करण्याचे महत्त्व अंगणवाडी सेविकांनी पथनाट्याद्वारे प्रभावीपणे सादर केले.महिलांच्या आरोग्यासंबंधी जागृतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सायवनतर्फे अनिमिया मुक्त भारत अभियान राबवून महिलांची एचबी तपासणी करण्यात आली.तसेच गरजूंना औषधे देण्यात आली.
पोषण आहार व सांस्कृतिक कार्यक्रम
मेळाव्यात पोषण आहाराचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. महिलांना संतुलित आहाराचे महत्त्व समजावून देण्यात आले.महिलांसाठी संगीत खुर्ची,चमचा-गोटी यांसारखे मनोरंजक खेळ आयोजित करण्यात आले होते.
योजनांची सविस्तर माहिती
ए.बा.वि.से.योजना प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी इंदुमती सावंत यांनी उपस्थित महिलांना या योजनेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजनांचा कसा लाभ घेता येईल,याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन वाढिया फाउंडेशन,आरोहण संस्था आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांनी केले होते. कार्यक्रमास आयसीडीएस कासा प्रकल्पाचे कर्मचारी वृंद तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.या मेळाव्याने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक नवा अध्याय लिहिला असून महिलांच्या आरोग्य व विकासासाठी हा एक स्तुत्य उपक्रम ठरेल,असा विश्वास अनेक वक्त्यानी आपल्या भाषणात व्यक्त केले .

