नवीन पाटील,सफाळे,
आजी व आजोबा हेच जीवनाचे खरे मार्गदर्शक – जॉन रोझारीयो,
निःस्वार्थ प्रेम आणि अमर्याद मायेचा ओढा असणार नातं म्हणजे ” नातवंड व आजी-आजोबांचं,” नातं असतं.वयाने मोठे अनुभवसंपन्न असणारे आजी-आजोबा हेच आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक असतात,असे भावनात्मक उद्गार तारापूर विद्या मंदिर,बोईसर शाळेच्या प्राचार्य जॉन रोझारीओ यांनी काढले. ” सांस्कृतिक व रचनात्मक,” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते
पालक आपल्यावर रागावतात,शिक्षा करतात वेळ प्रसंगी मार ही देतात,परंतु आपले लाड,हट्ट पुरवणारे, कौतुक करणारे आजी आजोबाचं असतात,असे ते पुढे म्हणाले,हे नातं म्हणजे आनंदाचा खजिना असून उतारवयात आपण त्यांचं आरोग्य जपलं पाहिजे. आपल्या व्यस्त दिनचर्येमधून काही वेळ त्यांच्यासाठी दिला पाहिजे,त्यांचा आदर केला पाहिजे.कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. शिक्षण,करिअर,पैसा यासोबत नाती,ही अत्यंत महत्वाची असतात,असे त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगत त्यांच्यात संस्कारमूल्य रुजवण्याचे काम केले.
सदर कार्यक्रमास प्राचार्य जॉन रोझारिओ,पर्यवेक्षक सपना चौधरी व विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा विशेष मान्यवर म्हणून उपस्थित होते.
यावेळी चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,वादविवाद स्पर्धा,कला,गायन,नृत्य, संगीत स्पर्धा,विज्ञान प्रदर्शन, कथा कथन,कविता,हस्तकला स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा, गणित कोडं स्पर्धा,स्कॉलरशिप परीक्षा,अशा शालेय अंतर्गत वर्षभर घेण्यात येणाऱ्या स्पर्धामधून निवडून आलेल्या बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा आजी-आजोबांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी मुलांनी ” मानसिक अयोग्य,” या विषयावर नाट्यमय संवाद सादर करत, मानसिक आजाराची लक्षण, त्याची कारणे सांगून यावर उपाय म्हणजे ” एकमेकांशी बोला,दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्या व एकमेकांना समजून घ्या,” असा संदेश दिला.तसेच काही विद्यार्थ्यांनी आकर्षक अशी पारंपरिक वेशभूषा करून जुन्या सिनेमामधील गाण्यांवर नृत्य केले.उपस्थित प्रेक्षक व आजी-आजोबांचे मनोरंजन करत त्यांना काही क्षण जुन्या काळात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. वर्षातून एकदा दिला जाणारा ” हाऊस ऑफ द इअर,” हा पुरस्कार यंदा ” रेड हाऊस,'” ला देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्पेश पाटील यांनी केले.यावेळी माध्यमिक वर्गातील विद्यार्थी,शिक्षक, तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

