सुरेश काटे,तलासरी,
तलासरीच्या कुर्झे धरणक्षेत्रात दुर्मिळ पक्षांचे वास्तव्य,
पालघर जिल्ह्याला सध्या पक्षांचे वैभव लाभले आहे. समुद्र किनारा,खाडीपट्टा खारफुटीचा प्रवेश,मिठागरे, भातशेती,शहरी भाग,आर्द्र व मिश्र पानगळीचे जंगल येथे विविध पक्षी आले आहेत. त्यामुळे येथे पक्ष्यांची विविधता ही मोठ्या प्रमाणात बघायला मिळते.
दरवषी थंडी पडू लागली की येथे मोठ्या प्रमाणात परदेशातील पाहुणे स्थलांतर करून या भागात येतात.सध्या तलासरी तालुक्यातील कुर्झे धरण परिसरात पाहुण्या पक्ष्यांची
वर्दळ वाढली आहे.विहार करणाऱ्या रंगीबेरंगी विविध जातीच्या आकर्षक पक्ष्यांच्या मनमोहक हालचाली पाहण्यासाठी परिसरात पक्षीप्रेमी येत आहेत.कुर्झे धरण परिसरात हिवाळी हंगामात विविध स्थलांतरीत पक्षांची गर्दी वाढते,त्यामध्ये जलचर पक्षांची संख्या अधिक असते.हिवाळ्याचा हंगाम अंतिम टप्यात आला असूनही पाहुणे पक्ष्यांचा मुकाम धरण परिसरातच कायम आहे. किनाऱ्यावरील गवत, धरणातील विविध वनस्पतीवर विविध प्रकारचे पक्षी मोठ्या प्रमाणात नजरेत पडू लागले आहेत.या आकर्षक अनाहुत पाहुण्या पक्ष्यांची वर्दळ वाढली आहे.यामध्ये लहान करकोचे, लहान,मध्यम व मोठे बगळे, वंचक,सूरय,तुतारी,राखी, जांभळे बगळे,पाणडूबी, काळ्या डोक्याचा शाराटी, टिटवी व पाणकोंबडया आदी छोटे-मोठ्या आकाराच्या पक्षी मुक्त विहरताना नजरेस पडत आहेत.
याशिवाय धरणात,भारतात निवासी असलेली परंतु या ठिकाणी स्थानिक स्थलांतर करून आलेली अडई- लेसर व्ह्सालिंग डक, धनवर ( हळदीकुंकू बदक) स्पॉट बिल्ट डक,काणूक- कॉटन पीग्मी गुज इ.विविधरंगी रानबदके पाहायला मिळत आहेत.
या धरणात परदेशी स्थलांतरीत रानबदकानीही हजेली लावली आहॆ.यामध्ये लालसरी ( कॉमन पोचार्ड ) लाल माथ्यामुळे उठून दिसणारे हे मध्यम आकाराचे बदक उत्तर व मध्य युरोपातील, तलवार बदक ( नॉर्दन पिनटेल) टोकदार शेपटी मुले उठून दिसणारे हे मध्यम आकाराचे बदक उत्तर अमेरिका,आशिया व युरोप, चक्रंग ( कॉमन टील ) चेहऱ्यावरील हिरवट लासर पट्ट्यामुळे उठून दिसणारे हे लहान आकाराचे बदक युरोप व रशियात,गडवाल मध्यम आकाराचे हे बदक उत्तर अमेरिका,आशिया व युरोप, भुवई बदक ( गार्गन) उठावदार भुवईमुळे यास ओळखणे सोपे जाते.आशिया व युरोपातील या पक्ष्यांचा यामध्ये समावेश आहे.
पक्षी अभ्यासक सचिन मेन यांना जाने.२०१६ मध्ये सर्वप्रथम हे परदेशी पक्ष नजरेस पडले होते.डिसें. महिन्यात कडाक्याच्या थंडीत धरण परिसरात पक्षी निरीक्षण करताना परदेशी स्थलांतरीत नयनसरी ( फेरुजिनस पोचार्ड ) या दुर्मिळ पक्ष्याचे दर्शन घडले होते.यावर्षीही परदेशी पक्षांचे दर्शन धरण परिसरात झाले असून त्यांच्याबरोबर चाँकलेटी वर्णाच्या या दुर्मिळ परदेशी स्थलांतरीत रानबदकाने येथे दर्शन दिल्याने पक्षीमित्रांत या धरणाविषयी कमालीचे कुतूहल निर्माण झाले आहे. इतर रानबदके मोठ्या संख्येने या धरणात दिसत असली तरी नयनसरीने मात्र एकट्यानेच दर्शन दिले,असे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहॆ. युरेशियात दलदली व तळ्यांच्या ठिकाणी हा पक्षी आढळतो.जलवनस्पती, पानकीडे,शिंपले,छोटे मासे खाऊन ते उदरभरण करतात. डुबी मारून ते खाद्य शोधतात.पालघर जिल्ह्यात २०१६ जाने.मध्ये हा पक्षी प्रथमच दिसल्याचे मेन यांनी पुढे जाने.२०१८ मध्ये हा पक्षी जोडीने दिसल्याचे सांगितले होते तर मधल्या काळात हे पक्षी या परिसरात दिसले नव्हते या.वर्षी पुन्हा या परदेशी पक्षांचे दर्शन धरण परिसरात झाले आहे. निसर्गाच्या सानिध्यात, परिसरातील हवामान आणि वातावरण तसेच विपुल प्रमाणात मिळणारे भक्ष्य त्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्षी कुर्झे धरण परिसरात वास्तव्य करीत आहेत.

