दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,” भाग क्र.२,( अंतिम )
गयाराम होऊनही पदरात काही पडणार नाही….
कालच्या पहिल्या भागात महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या हालचालीवर प्रकाशझोत टाकला होता.आज आपण भावी काळात आयाराम – गयारामची स्थिती कशी राहील ? यावर आपण बोलणार आहोत.दोन दिवसापूर्वी विरार येथे बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी आ.हितेंद्र ठाकूर यांनी केलेल्या जोशपूर्ण भाषणानंतर वातावरण पार बदलून गेले आहे.पण राजकारणात कधीही आणि काहीही घडू शकते,अशा शक्यतेमुळे आगामी काळात काही मूठभर मंडळी कशा हालचाली करतात,यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे.
आज ही जी मंडळी पडद्याआड आहेत,ते आज ना उद्या समोर येतील.जे काही मूठभर लोक तळ्यात-मळ्यात आहेत,त्यांनी उघडपणे समोर यायला हवे.पण तसे घडणार नाही,कारण ही मंडळी ज्या पक्षात जाण्याच्या प्रयत्नात आहेत,तो पक्ष आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीची उमेदवारी देईल का ? याविषयी ते स्वतः साशंक आहेत.त्यामुळे ते आजच्या घडीला कोणताही निर्णय घेण्यामध्ये मागे-पुढे करत आहेत.बाहेरून पक्षात येणाऱ्यांना भाजप कशी वागणूक देते,हे सर्वश्रुत आहे.ज्या कार्यकर्त्यांनी पडत्या काळात पक्षासाठी खस्ता खाल्या,त्या कार्यकर्त्यांना भाजप प्रथम प्राधान्य देत असतो आणि ते योग्यच म्हणावे लागेल.आज भाजपने अद्याप फोडाफोडीच्या राजकारणाला हवा देण्यास सुरुवात केलेली नाही.कारण त्यांच्या पक्षाकडे सध्या तरुणाईचा ओघ सुरू झाला आहे.येणाऱ्या प्रत्येक तरुणाला भाजप,पक्षात सामावून घेत आहे,पण त्यांना उमेदवारी देईल,अशी शक्यता वाटत नाही.भाजपची आजवरची वाटचाल पाहता,यावेळी देखील भाजपची भूमिका ” युज अँड थ्रो,” अशीच असेल.वसई व नालासोपारा विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अनेक प्रभागात मिळालेले मताधिक्य लक्षात घेता भाजप मधील इच्छुक
उमेदवाराचा वेलू गगनावर पोहोचला आहे.अशावेळी
पक्षात आलेल्या आयारामाना संधी मिळेल,असे वाटत नाही.त्यामुळे पडद्याआड असलेले बहुजन विकास आघाडीचे जे काही मूठभर लोक तळ्यात मळ्यात आहेत.ते सध्या तरी ” वेट अँड वॉच,” च्या भूमिकेत आहेत.अशा सर्व परिस्थितीमध्ये आ.हितेंद्र ठाकूर यांनी मेळाव्यातl पक्षाची उभारणी व शिस्त न पाळणाऱ्याना पक्षाचे दरवाजे कायम बंद होतील,मग तो कितीही मोठा असला तरी कारवाई होणारच,असा इशारा दिल्यामुळे अनेक पदाधिकारी नगरसेवक व नगरसेविकांचे धाबे दणाणले आहे.
समाप्त,

