जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे व्यवसाय करिअर मार्गदर्शन सप्ताहाचे आयोजन,
के.व्ही.हायस्कूल व आर. वाय.ज्युनियर कॉलेज येथे व्यवसाय करिअर मार्गदर्शन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या सप्ताहाचे पहिले पुष्प ज्येष्ठ समुपदेशिका व शाळेच्या १९८६ दहावी बॅचच्या विद्यार्थिनी वास्तुविशारद मंजुषा कुलकर्णी यांनी गुंफले.
याप्रसंगी शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य अवधूत गावड यांनी उच्चविद्याविभूषित,वीस वर्षापेक्षा अधिक काळ करियर कौन्सिल क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनुभवसंपन्न व शेकडो तरुण तरुणींनी देशात व परदेशात शिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करून भविष्य उज्ज्वल करणारे व्यक्तिमत्व म्हणजे मंजुषा कुलकर्णी आहेत.त्या हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.अशा शब्दात त्यांचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या श्रेष्ठ महाराष्ट्र पोर्टलला भेट देऊन देश विदेशातील शिक्षणाच्या संधी,या विषयावरील विपुल ज्ञानाचा फायदा करुन घ्यावा. त्यांनी एआयएम ओव्हरसीज एज्युकेशन कन्सल्टंटच्या माध्यमातून वैद्यकीय,अभियांत्रिकी,औषध निर्माण शास्त्र,वित्त व्यवस्थापन, मानसशास्त्र,सार्वजनिक आरोग्य,लक्झरी ब्रँड्स व्यवस्थापन,क्रीडा व्यवस्थापन,सप्लाय चेन मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रात सेवा व शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या मौलिक मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आपल्या भविष्याची दिशा निश्चित करावी,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.प्राचार्यांच्या हस्ते मंजुषा कुलकर्णी यांचा यथोचित सत्कार करण्यातआला.
समुपदेशक मंजुषा कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये करिअरची निवड करताना विद्यार्थ्यांनी आपली आवड, योग्यता,कौशल्य,कुटुंबाची पार्श्वभूमी,आर्थिक स्थिती, बाजारातील संधी व मागणी यांचा विचार करून विद्या शाखेची निवड करावी.विविध विद्या शाखांचा परिचय करून देत असताना कोणतेही क्षेत्र निवडले तरी कठोर प्रयत्नाशिवाय पर्याय नाही, यशाला शॉर्टकट नसतो,याचे विद्यार्थ्यांनी सदैव भान ठेवले पाहिजे.परदेशात कमवा व शिका,या योजनेचा लाभ घेवून कुटुंबावरील आर्थिक भार हलका करता येतो.अभिरुची चाचणीच्या माध्यमातून आपली आवड व आपले व्यक्तिमत्व याचा शोध घ्यावा.
परदेशी शिक्षणासाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षा व आवश्यक कागदपत्रे यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. कौसेरा,उदेमी व इडिक्स,या वेबसाईटवरून निशुल्क विविध कोर्सेस करून कौशल्य विकसित करता येते. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा.शाळेतील विद्यार्थ्यांना माझ्याकडून निशुल्क सेवा पुरवली जाईल.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्युनियर कॉलेजच्या शिक्षिका शितल अहिरे यांनी केले. शिक्षक संतोष यादव यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

