केदार पाटील, केळवे रोड,
केळवे येथे महिला लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण व बालआनंद मेळावा संपन्न,
केळवा ग्रामपंचायत क्षेत्रात आयोजित या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी प्रशिक्षण, बालविकास,सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचा समावेश होता.या उपक्रमांनी महिलांचे सक्षमीकरण आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली.या शिबिरामध्ये विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक विजया गोस्वामी मॅडम यांनी महिलांच्या हक्क, सायबर क्राईम,आणि मोबाईलवरील फसवणूक मेसेजेसबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
जिल्हा परिषद सदस्य वैशाली करबट मॅडम यांनी अंगणवाडीच्या विविध योजनांचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे,तसेच बालकांच्या पोषण व विकासासाठी प्रयत्न करावेत, यावर भर दिला.
बालकल्याण समिती सदस्य शुभांगी मॅडम यांनी बाल संगोपन,पोक्सो कायदा आणि महिला बालविकास योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
पंचायत समिती सदस्य भारती सावे मॅडम यांनी मुलींच्या शिक्षण आणि विकासासाठी ” लेक लाडकी, ” योजनेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध वेशभूषा परिधान करून सादरीकरण करण्यात आले.
पोषण आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी “पोषण हांडी,” हा उपक्रम राबवण्यात आला.
मुलांच्या वाढदिवसाचे आयोजन करून त्यांना प्रेरणा व आनंद मिळवून देण्यात आला.
महिलांनी रांगोळीच्या माध्यमातून विविध विषय मांडले.
पालकांनी तयार केलेल्या आरोग्यदायी व पोषणयुक्त पदार्थांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
गरोदर मातांसाठी विशेष कार्यक्रम घेत त्यांना आहार, आरोग्य आणि सुरक्षिततेचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी पारंपरिक तारबा नृत्य सादर करून सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
” लेक लाडकी,” योजनेच्या लाभार्थी पालकांचा सत्कार करण्यात आला.तसेच यावर्षी मंजूर झालेल्या योजनांच्या लाभार्थ्यांचेही कौतुक करण्यात आले.
बचतगटाच्या अध्यक्षा, सचिव, ग्रामपंचायतीच्या महिला सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी प्रेरणादायी सत्रे,बालकांच्या विकासासाठी विविध उपक्रम आणि समाजासाठी सृजनशील योगदान देणाऱ्या उपक्रमांचा समावेश होता. महिलांचे सक्षमीकरण आणि बालकांच्या विकासासाठी हा कार्यक्रम एक प्रभावी उपक्रम ठरला.

