दीपक मोहिते,
राज्यभाजपच्या कार्य.अध्यक्षपदी रविंद्र चव्हाण,
माजी सार्वजनिक बांधकाममंत्री व पालघर/सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.काल शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रीय नेत्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.येत्या दोन महिन्यात संघटनात्मक निवडणुका पार पडल्यानंतर त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.तोवर विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्षपदावर कार्यरत राहतील.
चव्हाण यांची राजकीय वाटचाल कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक ते प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अशी झाली आहॆ.ते २००५ साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले,२००७ साली स्थायी समितीच्या सभापतीपदी त्यांची नियुक्ती झाली.त्यानंतर २००९ साली डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले.त्यानंतर त्यांनी २०१४,२०१९ व २०२४ या तीनही विधानसभा निवडणुका सहजरित्या जिंकल्या.२०१६ साली त्यांची राज्यमंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली.त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये त्यांनी सार्व.बांधकाममंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्यावर असताना पालघर व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडे सोपवण्यात आले.त्यांच्या पालकमंत्रीपदाच्या काळात दोन्ही जिल्ह्यात पक्षाची चांगलीच भरभराट झाली.या दोन्ही जिल्ह्यापैकी पालघर जिल्ह्यातील डहाणू वगळता या दोन्ही जिल्ह्यातील सर्व जागा महायुतीने जिंकल्या.याचे सारे श्रेय रविंद्र चव्हाण यांना जाते.त्यांना फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात यंदा स्थान मिळाले नाही,त्याचवेळी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले होते.काल राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी प्रदेश भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली.

