दीपक मोहिते,
उद्या शिर्डी येथे भाजपचे एकदिवसीय अधिवेशन,नवीन प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता,
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर भाजपने आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसली आहॆ.उद्या अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी येथे भाजपचे भव्य अधिवेशन होत आहॆ.
या अधिवेशनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे तमाम मंत्री उपस्थित राहणार आहेत. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री तसेच राज्यातील भाजपाचे सर्व मंत्री,केंद्रातील मंत्री,खासदार,आमदार, जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष असे १५ हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे होत आहे.नुकत्याच मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणनिती,या अधिवेशनात ठरवण्यात येणार आहॆ. या अधिवेशनात आज सकाळी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली., या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली तसेच विविध राजकीय मुद्द्यांवरही विचारविनिमय करण्यात आला.
अधिवेशनासाठी साई संस्थानच्या प्रसादालया शेजारी असलेल्या शताब्दी मैदानावर तीन भव्य मंडप उभारण्यात आले आहेत.उद्या सकाळी ११.०० वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे अधिवेशाचे उद्घाटन करतील.दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाजपच्या मंत्री,खासदार, आमदारांसह आलेल्या पदाधिकाऱ्यांसमोर मार्गदर्शनपर भाषण करतील.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच पुढील वाटचालीच्या रणनितीवर अधिवेशनात विचारविनिमय व चर्चा होईल.
अधिवेशनासाठी आठ एकर जागेवर भव्य मंडप उभारण्यात आला आहॆ.या मंडपात पदाधिकाऱ्यांसाठी १५ हजार खुर्च्या लावण्यात आल्या आहेत.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विधानसभा निवडणुकीत विजयी होऊन मंत्री झाले आहेत.त्यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष कोण ? याविषयी अमित शहा राज्यातील प्रमुख नेत्याशी चर्चा करतील. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत मोठी प्रक्रिया असून या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.त्यामुळे याच अधिवेशनात नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहॆ.या पदासाठी माजी मंत्री आणि डोंबिवलीचे आ.रविंद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल,असा अंदाज आहे.इतर काही नावेही चर्चेत आहेत,पण रविंद्र चव्हाण यांचे पारडे जड आहॆ.अशा परिस्थितीत शिर्डीच्या अधिवेशनात प्रदेशाध्यक्षपदासाठी नावाची घोषणा होणार का ? याविषयी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहॆ.

