संजय लांडगे,वाडा,
वाडा – मनोर राज्यमार्गावर झालेल्या अपघातात एक ठार,तीन जखमी,
वाडा तालुक्यातील पाली गावाच्या हद्दीत वाडा – मनोर या राज्यमार्गावर टेम्पो आणि दुचाकीच्या विचित्र अपघातात एक मुलगी ठार झाली.तर तिची बहीण भाऊ व टेम्पो चालक,असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
काल रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. कंचाडहून वाड्याच्या दिशेने येणारा आयशर टेम्पो व वाड्याहून पालीच्या दिशेने जाणारी दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक बसून हा अपघात झाला.या अपघातात दोन्ही वाहने रस्त्याकडेला उलटल्याने दुचाकीवरील तिघे व टेम्पो चालक,असे चौघांना गंभीर दुखापत झाली.त्यांना वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता स्नेहा बंधू झिरवा ( वय२६ ) हीचा मृत्यू झाला तर टेम्पोचालक गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला अन्य ठिकाणी उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अंकिता अंबात व हर्षल अंबात यांनाही इतरत्र हलवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
निखिल झिरवा याने दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पोचालका विरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मयूर शेवाळे हे पुढील तपास करत आहेत.

