दीपक मोहिते,
महिला मेळावा व लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन,
आज एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प,पालघर अंतर्गत महिलांसाठी विशेष मेळावा व लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत वेढी हद्दीतील वीट भट्टीवर करण्यात आले.या कार्यक्रमात महिला व बालकल्याणाच्या विविध योजनांबद्दल माहिती देण्यात आली तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्या सरिता सुतार,पंचायत समिती सदस्या रेखा तरे, वेढी गावचे सरपंच नचिकेत पाटील,उपसरपंच अभिजीत पाटील,तसेच विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते. वीटभट्टी व गावातील सुमारे १०० महिला,बालके आणि किशोरी मुली या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार यांनी केले.मुख्यसेविका सुरेखा सूरवसे यांनी महिला व बालकल्याणाच्या योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. लायन्स क्लब केळवा विभागाचे अध्यक्ष डॉ.हर्षल यांच्या सहकार्याने उपस्थित लाभार्थ्यांना स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात वीटभट्टीवरील पाचवी ते दहावीपर्यंत शिकलेल्या किशोरी मुलींना वाचन साहित्य भेट देण्यात आले. तसेच टीएचआर ( टेक होम रेशन ) पासून तयार केलेल्या विविध पाककृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले.महिलांना ग्रामपंचायत वेढीतर्फे ज्यूट बॅग देऊन गौरविण्यात आले.अंगणवाडी सेविकांनी व्यसनमुक्ती, शाळागळती आणि पोषण आहार या विषयांवर पथनाट्य सादर करून प्रबोधन केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र एडवनमार्फत लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप वीट भट्टीवरील महिला व मुलांनी सादर केलेल्या पारंपरिक तारपा नृत्याने करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत वेढी, विटभट्टी मालक सागर कवळी, आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रवीण भावसार व प्रकल्प अधिकारी अमोल पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नियोजन कल्पना पिंपळे यांनी केले. त्यांच्या कार्याबद्दल व एकात्मिक बालविकास विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्या यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन कौतुक करण्यात आले.

