जव्हार,प्रतिनिधी,
जव्हार अर्बन बँकेस ” बँको ब्लू रिबन २०२४,” पुरस्कार जाहीर,
दि.जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेस त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय स्तरावर ” बँको ब्लू रिबन २०२४,” पुरस्कार जाहीर झाला आहे.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद बा.मुकणे यांनी ही माहिती दिली.हा पुरस्कार २७ ते २९ जाने.२०२५ दरम्यान ॲम्बी व्हॅली,लोणावळा येथे होणाऱ्या राष्ट्रीय सहकारी परिषदेत प्रदान केला जाणार आहे.ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी आणि व्यावसायिकांसाठी आर्थिक आधार बनलेल्या या बँकेने स्थापनेपासूनच उत्कृष्ट कामगिरी केली आहे.बँकेची स्थापना श्रीमंत यशवंतराव मुकणे,महाराजा जव्हार संस्थान यांनी केली असून, बँकेने ७५ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे.
बँकेचे चेअरमन निलेश ज. पाटील यांनी सांगितले की, बँकेचे मार्गदर्शक व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने कुशलतेने बँकेचा कारभार केला त्यामुळेच बँकेने ग्राहकांचा विश्वास संपादन करून बँकिंग क्षेत्रात आदर्श नागरी बँक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.बँकेस यापूर्वी ” उत्कृष्ट सहकारी बँक,” हा पुरस्कार दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन ली.मुंबई तर्फे मिळाला होता.आता ” बँको ब्लू रिबन २०२४,” हा दुसरा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाल्याने बँकेचे संचालक मंडळ,मुख्य कार्यकारी अधिकारी,सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे कौतुक होत आहे.या यशामागे सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांचा विश्वास आणि सहकार्य तसेच बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांची मेहनत आहे.संचालक मंडळाने सर्वांचे आभार मानले असून, बँकेने भविष्यातही अशीच प्रगती होत राहावी,अशी इच्छा व्यक्त केली आहे.

