वसंत भोईर,वाडा,
अनधिकृत बांधकामांना महसूल विभागाचे अभय,
तालुक्यातील घोणसई ग्रामपंचायत हद्दीतील आलमायटी ऑटो कंपनीचे अनधिकृत बांधकामाचे प्रकरण ताजे असतानाच आता वरले ग्रामपंचायत हद्दीतील टिना रबर अँन्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे अनधिकृत बांधकाम देखील चर्चेचा विषय बनला आहॆ.शिवसेनेचे चर्मोद्योग कामगार सेनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष भरत गायकवाड यांनी हे प्रकरण उघडकीस आणले असून:त्यांनी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिका-यांकडे एका तक्रारीद्वारे केली आहे.
तालुक्यातील वरले ग्रामपंचायत हद्दीत ” टिना रबर अँन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड,” ही कंपनी आहे.या कंपनीची गट नंबर ७१/२ क्षेत्र ४२ हजार ६०० चौ.मी.व गट नंबर क्षेत्र १० हजार ५५० असे एकूण ५३ हजार १५० चौ.मी.एवढी जागा असून त्यांनी सदरची जागा बिनशेती करून घेतली आहे.मात्र नगररचना विभागाकडून कोणताही नकाशा मंजूर करून न घेता या जमिनीवर बांधकाम करण्यात आले आहे.शासनाच्या नियमांनुसार कंपनीचे कोणतेही औद्योगिक बांधकाम करताना सर्वप्रथम बांधकाम नकाशा मंजूर करून घेतल्यानंतर बांधकाम करावयाचे असते.मात्र कंपनीने असे न करता थेट बांधकाम केले आहे.त्याचबरोबर कंपनीने बांधकाम करताना राज्य महामार्गापासून योग्य अंतर सोडण्यात आले नसल्याचा आरोप गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून कंपनीचे बांधकाम निष्कासित करून अनधिकृत बांधकाम करणारा मालक व व्यवस्थापकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी भरत गायकवाड यांनी जिल्हाधिका-यांकडे एका तक्रारीद्वारे केली आहे.
या संदर्भात वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
प्रतिक्रिया-
टिना कंपनीने नगररचना विभागाकडून नकाशा मंजूर करून न घेता अनधिकृत बांधकाम केले आहे.कंपनीत बांधकाम करताना नकाशा मंजूर करून घ्यावा लागतो. त्यानंतर त्या नकाशाप्रमाणे बांधकाम करावे लागते,मात्र नकाशा मंजूर करून न घेता बांधकाम केल्याने ते बांधकाम अनधिकृत आहे.सदरचे बांधकाम महसूल विभागाने निष्कासित करून मालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करावा.
भरत गायकवाड
तक्रारदार
कोट
वरले येथील गट क्रमांक ७१/२ व ७ या जागेत औद्योगिक प्रयोजनार्थ प्रस्ताव जिल्हाधिकारी पालघर यांचेकडून या कार्यालयास प्राप्त झाला असून सदर प्रस्तावास अद्यापपर्यंत मंजूरीची शिफारस करण्यात आलेली नाही.
रा.रा.दनाने
नगर रचनाकार
नगररचना कार्यालय,पालघर,
कोट
टिना रबर कंपनीने शासनाच्या नियमाप्रमाणे बांधकाम केले असून सर्व प्रकारच्या परवानग्या घेतल्या आहेत.
शुभेंदू शुक्ला
व्यवस्थापक,टिना रबर कंपनी
कोट
टिना रबर कंपनीने संबंधित विभागाकडून बांधकाम परवानगी घेणे आवश्यक असून ती घेतली असल्यास बांधकाम परवानगीची एक प्रत ग्रामपंचायतीकडे सादर करण्यासाठी कंपनीकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
समता पठारे
ग्रामसेविका,
ग्रामपंचायत वरले ता.वाडा

