दीपक मोहिते,
पालघर तालुक्यात
बालचित्रकला स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न,
स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वसई विकासिनी दृककला महाविद्यालय,वसई ( पूर्व ) आयोजित बाल चित्रकला स्पर्धा २०२४-२५,काल पालघर येथील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या म. नी.दांडेकर हायस्कूलमध्ये यशस्वीरित्या पार पडली.
स.१०:०० ते दुपारी १२:३० दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा,कर्णबधिर शाळा,अनुदानित व विनाअनुदानित शाळा,केंद्रीय विद्यालय,अशा विविध ५० शाळेतील एकूण ६७५ विद्यार्थी सहभागी झाले होते.या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रातील करिअरच्या संधींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.ललित कला विभागाचे वैभव ठाकूर,उपयोजित कलेचे वर्षा गावडे,युटिलिटी अभ्यासक्रमाचे कल्पेश कामत, व इंटिरियर डिझाईनिंग अँड डेकोरेशनचे ध्रुवीन सोनी यांनी स्लाईड शोद्वारे विद्यार्थ्यांसह पालक व कलाशिक्षकांना माहितीपूर्ण दिली.सदर माहिती शालेय शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत.
या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे,चषक व कला साहित्य मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सरचिटणीस विजय वर्तक यांनी, हल्ली मुले मोबाईलमध्ये जास्त व्यस्त असतात,ज्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर,प्रकृतीवर होत असतो,तर त्यापासून मुलांना परावृत्त करण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना योग्य ते साहित्य द्यावे,जेणेकरून मुले आपल्या कल्पना चित्राद्वारे प्रगट करतील.आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्याध्यक्ष शिरीष पाठारे यांनी बालचित्रकलेचे महत्व सविस्तरपणे सांगितले.स्पर्धेच्या परीक्षणाचे काम सागर पवार,चार्ली कोरिया,कुमारी सिद्धी सावंत व कुमारी प्रियदर्शनी मर्दे यांनी पार पाडले.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. धनराज ख्याडे ( स्पर्धा प्रमुख ) व कुमारी प्रियदर्शनी मर्दे (केंद्रप्रमुख) यांच्या नेतृत्वाखालील टीमने ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली. आर्यन एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक व कलाशिक्षकांनी दिलेले सहकार्य,तसेच सहभागी शाळांचे मुख्याध्यापक,कला शिक्षक व संस्थेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक व विद्यार्थी यांचे संस्थेतर्फे संयुक्त चिटणीस व माजी प्राचार्य दिगंबर गवळी यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा गावडे आणि दिगंबर गवळी यांनी केले.

