जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे शिव छत्रपती समाज सेवा मंडळाचा ४१ वा वर्धापनदिन साजरा,
वाडा,जव्हार, मोखाडा,विक्रमगड, डहाणू, शहापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील आदिवासी लोकांसाठी निस्वार्थपणे गेली ४० वर्षे सामाजिक व शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या शिवछत्रपती समाज सेवा मंडळाचा ४१ वा वर्धापन दिन व संस्थापक पुरुषोत्तम पाटील यांचा ७४ वा वाढदिवस मोखाडा,जव्हार, भिवंडी,वसई भागात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
मोखाडा तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले आश्रमशाळा आशे येथे ४३५ विद्यार्थ्यांना मैत्री फाउंडेशन बोरीवलीतर्फे ब्लॅंकेट,बेडशीट,कंपास, मिठाई वाटप करून पुरुषोत्तम पाटील यांचा आश्रमशाळेतर्फे वाढदिवस साजरा करण्यात आला.तसेच जव्हार दुर्गम भागातील कर्मवीर भाऊराव पाटील आश्रमशाळा वावर वांगणी येथील ४२६ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मंडळातर्फे अन्नदान मैत्री फाउंडेशन तर्फे ब्लॅंकेट,चादर, चटई,मिठाई,कंपास,चॉकलेट, बिस्कीटचे वाटप वेदांत त्रिवेदी,मुकेशभाई त्रिवेदी हस्ते करण्यात आले.तसेच संत गाडगे महाराज आश्रमशाळा भिवाळी येथील पहिली ते दहावी विद्यार्थ्यांसाठी ह.भ.प. सौ.प्रीतीताई पाटील वेहेले, भिवंडी यांनी ” संस्काराचे महत्त्व, ” विषयावर व्याख्यान दीले.संस्काराविना आजचा तरुण भरकटत चालला आहे.चांगले संस्कार हेच आपल्या जीवनाच्या यशाची गुरुकिल्ली आहे.विद्यार्थ्यांनो जीवनात नेहमी खरे बोलावे खोट्याचा आधार घेऊ नये. खोट्या गोष्टींतून मिळणारा आनंद,हा क्षणिक असतो तर खऱ्या व सत्य गोष्टीतून मिळणारा आनंद अनंत काळ टिकणारा असतो.” सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नही हो सकता,” हे त्यांनी विद्यार्थ्यांना ठणकावून सांगितले.तसेच जूचंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील इयत्ता अकरावी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी जीवनात संस्काराचे महत्त्व या विषयावर सुप्रसिद्ध शिवचरित्रकार ह.भ. प. शिवाजी सातपुते यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.उपस्थिताना मार्गदर्शन करताना सातपुते म्हणाले,शालेय जीवन हे दिशा देणारे आहे,आज १ जाने. २०२५ नव्या वर्षात संकल्प करा,चांगल्या गोष्टींचा स्विकार करा,निर्णय घ्या व त्यांची अंमलबजावणी करा.चांगले मित्र जोडा व स्वतःच्या ताकतीवर उभे रहा,संयमी व नम्र व्हा,आई-वडिलांचा मान ठेवा,असे आवाहन त्यांनी केले.सायंकाळी पीडित मानवसेवेचे तीर्थस्थान अपना घर वसई चिंचोटी येथील आश्रममध्ये प्रभूच्या समवेत व अपना घर आश्रमचे विश्वस्त रामस्वरूप अग्रवाल,सुभाष गुप्ता,सुबोधजी गुप्ता हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पुरुषोत्तम पाटील व रामचंद्रजी रामूका यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त भजनाचा व १७३ प्रभुंना भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमास पुरुषोत्तम पाटील यांचा परिवार,मंडळाचे कार्यकर्ते विद्याधर म्हात्रे,हरेश भोईर,पत्रकार भरत म्हात्रे, मोहन पाटील,स्वाध्यायी सुरेश पाटील,धर्माजी म्हात्रे उपस्थित होते.मोखाडा आश्रमशाळेचे भामरे,जव्हारचे पवार,गाडगे महाराजचे संचालक आवटी,जूचंद्र कर्मवीर हायस्कूलचे मुख्याध्यापक जगताप,गवळी,जितेंद्र भोईर,अपना घरचे रामस्वरूप अग्रवाल यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.

