जव्हार प्रतिनिधी,
भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यम शाळा,जव्हार येथे ” सावित्री उत्सव,” साजरा.
नव्या वर्षातील पहिला उत्सव म्हणून ३ जाने.रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ” सावित्री उत्सव,” म्हणून भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यम शाळा जव्हार,येथे उत्साहात साजरा करण्यात आला.शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम यांच्या सूचनांचे पालन करीत हा नवीन उपक्रम महान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती करून देण्यासाठी येणाऱ्या पिढीतील मुला-मुलींकरिता महत्वपूर्ण ठरत आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक अर्जुनकुमार राठोड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली.या कार्यक्रमांमध्ये शाळेतील विद्यार्थिनीं सहभागी झाल्या होत्या.यावेळी प्रत्येक विद्यार्थिनींने आपल्या कपाळावरती सावित्रीबाई फुले यांच्या कपाळावरील आडव्या लाल कुंकवाच्या चिरेप्रमाणे स्वतः तशी चिर ( रेषा ) ओढली होती. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांचे लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांची वेशभूषा करून विद्यार्थी सभागृहात दाखल झाले त्यांच्या पाठोपाठच इयत्ता तिसरी व चौथीच्या सर्व विद्यार्थिनींनी हातात ज्ञानाची पणती घेऊन त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत उजेड पसरवत होते.तसेच या कार्यक्रमांमध्ये जर मौलाचे योगदान दिले असेल तर सिनियर के.जी. तील साडेपाच वर्षाच्या लहानशा कुमारी गार्गी गायकवाड या विद्यार्थिनीने. तिने सुमारे दीड ते दोन मिनिटे सावित्रीबाई फुले व त्यांच्या जीवनावरील यशोगाथा सांगणाऱ्या कवितेतून सुंदर असे वर्णन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका दिपाली ठाकरे यांनी केले,तर शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका लता नायकर, सहाय्यक शिक्षिका प्रणाली मुकणे व सहाय्यक शिक्षिका तृप्ती गोरखा यांनी या कार्यक्रमाचे चांगले नियोजन केले.शाळेचे मुख्याध्यापक अर्जुनकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनातून व सांस्कृतिक विभाग प्रमुख अविनाश मुकणे यांच्या आयोजनाने हा उत्सव आनंदी वातावरणात पार पडला.

