जव्हार प्रतिनिधी,
मातेसह बाळाचाही मृत्यू , अचानक मृत्यू कसा झाला कुटुंबीयांची चौकशीची मागणी.
मोखाडा तालुक्याची गरोदर महिलेच्या मृत्यूची घटना ताजी असतांना जव्हार येथे एका महिलेची प्रसूती होत असताना अचानक तिचा व बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयात काल रात्री घडली आहे.ती महिला सुरवातीला चांगली होती, स्वतःहून प्रसुती करिता गेली असताना तिचा अचानक मृत्यू कसा झाला, याबाबत सखोल चौकशी करावी,अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
विक्रमगड तालुक्यातील गालतरे येथील कूंता वैभव पडवळे वय ३१ वर्ष,या महिलेला प्रसूतीकरिता जव्हार उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचा नियमित विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होता.मात्र येथे योग्य त्या वैद्यकीय सुविधा नसल्याने,तुम्ही तिला जव्हारच्या रुग्णालयात घेऊन जा,असे सांगून,पुढील उपचारासाठी तिला जव्हार उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
रात्री १२. ०० च्या दरम्यान तिला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या,तिला प्रसूती गृहात दाखल करण्यात आले.यावेळी कंत्राटी पद्धतीवर कामावर असलेले स्त्रीरोग तज्ञ डॉ.आशिष सोनवणे यांनी तिची प्रसूती केली,काही वेळातच तिचे हृदय अचानक थांबले आणि त्या महिलेने दम सोडला.दरम्यान बाळाचे ठोके सुरू असल्याने बाळाची प्रसूती करण्यात आली,मात्र प्रसूती होता असताना बाळाचाही मृत्यू झाला.
गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांमुळे आरोग्य यंत्रणा पुरती ढिसाळ झाली आहे.त्यामुळे आदिवासी ग्रामीण भागात अनेक महिला रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटना जव्हार, मोखाडा,विक्रमगड तालुक्यातील घडल्या आहेत.
कोट –
माझ्या बहिणीची प्रकृती चांगली होती,तिचा नियमित उपचार कूर्झे प्राथमिक आरोग्य केंद्र व विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात सुरू होता. आम्हाला विक्रमगडमध्ये सुविधा नाहीत,तुम्ही तिला जव्हारला घेऊन जा,असे सांगण्यात आले.आम्ही तिला जव्हारला रुग्णालय दाखल केले,ती स्वतःहून प्रसुतीगृहात गेली अवघ्या दहा मिनिटात तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी खबर मिळाली आणि आमच्या पाया खालची जमीनच सरकली,दरम्यान थोड्यावेळाने बाळाचा ही मृत्यू झाल्याची खबर मिळाली,आम्हाला हे ऐकून धक्काच बसला आहे.येथे शिकाऊ डॉक्टर भरती केले आहेत,याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी आम्ही केली आहे.
– अंकुश विष्णू अतकारी, चाबके-तलावली, मातेचा भाऊ.
कोट –
प्रसूती वेळी महिलेची प्रकृती व्यवस्थित होती,मात्र अचानक तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तीचा प्रसूतीच्या वेळीच मृत्यू झाला, दरम्यान बाळाला वाचवण्याचाही खूप प्रयत्न करण्यात आला,मात्र दोघांचा मृत्यू झाला.याबाबत शविच्छेदनानंतर खरे कारण कळेल,
– डॉ.भरतकुमार महाले, वैद्यकीय अधीक्षक जव्हार-

