दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
महायुती व महाविकास आघाडीमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता,
विधानसभा निवडणुकीनंतर महायुती व महाविकास आघाडीमध्ये प्रचंड मरगळ आली आहे.या निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळूनही त्यांचे मंत्री व आमदारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.शिवसेनेचे एकनाथ शिंदे कुठे गायब झाले आहेत देवजाणे,तर अजित पवार पक्षांतर्गत घडामोडीमुळे प्रचंड तणावाखाली आले आहेत.धनंजय मुंडे व वाल्मिक कराड,या दोघांमुळे त्यांच्या पक्षाची प्रतिमा पार डागळली गेली आहे.पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे त्यांनी थेट अजित पवार यांना आव्हान दिले आहे.मराठा आरक्षण प्रश्नी पक्ष बॅकफूटवर गेला असताना आता छगन भुजबळ यांना डावलल्यामुळे ओबीसी समाज देखील त्यांच्या पक्षापासून दुरावण्याची शक्यता आहे.आज त्यांची अवस्था ” धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं,” अशी झाली आहे.
निवडणुकीनंतर आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल,अशा आशेवर असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या तोंडाला भाजपने पाने पुसली.त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या राजकीय हालचाली पार थंडावल्या.मुख्यमंत्रीपदी असताना ते उठसुठ दिल्ली गाठत असत,आता ते बंद झाले असून सध्या त्यांचे हेलिकॉप्टर हे अधून मधून त्यांच्या दरे गावात उतरत असतं.सध्या त्यांचा बहुतांश वेळ नातवासोबत शेतात व्यतीत होत असतो.दुसरीकडे त्यांच्या सहकारी मंत्र्यांनीही अद्याप कामकाजाला सुरुवात केलेली नाही.काही मंत्र्यांनी तर आपल्या खात्याचा पदभार देखील स्विकारलेला नाही.अजित पवार गटाचीही अशीच काहीशी अवस्था असल्याचे पाहायला मिळत आहे.एरवी या दोन्ही पक्षाचे प्रवक्ते प्रत्येक विषयावर भरभरून बोलत असत,आता ते कुठे गायब झाले आहेत,हे कळायला मार्ग नाही.निवडणुकीपूर्वी महायुतीच्या या तीन घटक पक्षात एकजिनसीपणा पाहायला मिळत होता.सध्या या तिघांची तोंडे एकमेकाच्या विरुद्ध दिशेला आहेत.भाजपचे वरीष्ठ नेते गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपद आम्हाला मिळावे,यासाठी शहा यांना साकडं घातले होते,पण त्यांच्या हृदयाला पाझर फुटला नाही.त्यामुळे एकनाथ शिंदे आता आपल्या दरे गावातील शेतीत आपल्या नातवासोबत निवांत झाले आहेत.भाजपने या दोघांना आता जेवणाच्या ताटातील कडीपत्यासारखे बाहेर फेकून दिले आहे.महानगरपालिका निवडणुकीनंतर भाजप १४५ हा जादुईचा आकडा गाठण्यासाठी फोडाफोडी करण्याची शक्यता आहे.त्यांचे मिशन लोटसचा आराखडा तयार आहे.स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी भाजपला केवळ १२ जागांची गरज आहे.भाजप,शिंदे व अजित पवार गटाच्या किमान २० ते २५ आमदारांना वश करू शकतात.तसे घडल्यास शिंदे व पवार गटाची अवस्था,ही ” तेल गेले,तूप गेले,हाती आले धुपाटणे,” अशी होईल.
महाविकास आघाडीची तर अवस्था महायुतीपेक्षा अधिक वाईट झाली आहे.निवडणुकीतील पराभवाने राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ),भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना ( उबाठा ) या तिन्ही पक्षाचे अवसान पार गळून पडले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,या दोन पक्षाशी केलेली साथसंगत आपल्याला परवडणारी नाही,अशी उपरती उद्धव ठाकरे यांना झाली असून विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी आता वेगळी चूल मांडण्याचे ठरवले आहे.या दोघांच्या नादी लागल्यामुळे आपण बाळासाहेबांच्या प्रखर हिंदुत्वापासून लांब गेल्याचा भाजपचा दावा लोकांना पटू लागला आहे. हे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे आता पुन्हा हिंदुत्वाकडे वळण्याच्या तयारीत आहेत.त्यांचे महत्वाचे मोहरे यापूर्वीच एकनाथ शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत.तर आणखीही नेते,त्याच मार्गावर आहेत.त्यामुळे सावध झालेले उद्धव ठाकरे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत.
ज्या पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गट व काँग्रेस पक्षाची गेली सहा दशके वर्चस्व होते,ते या निवडणुकीत पार उध्वस्त झाले.कराड विधानसभा मतदारसंघात त्यांच्या पृथ्वीराज चव्हाण यांचा झालेला पराभव हा पक्षाला जिव्हारी लागणारा होता.२०१४ मध्ये या दोन्ही पक्षाच्या वाताहातीला सुरुवात झाली,ती अद्याप थांबू शकली नाही.लोकसभा निवडणुकीत जे काही यश आघाडीला मिळाले,ते नकारात्मक होते.वाढती महागाई,बेरोजगारी,कृषी क्षेत्राची केंद्र सरकारडून झालेली गळचेपी,जीएसटी मध्ये झालेली भरमसाठ वाढ,आदी कारणामुळे महाविकास आघाडीला मतदारांनी डोक्यावर घेतले होते.पण या यशामुळे काँग्रेसचे नाना पटोले व सेनेचे संजय राऊत या दोघांच्या डोक्यात हवा गेली व त्यांचे ” होत्याचे नव्हते,” झाले.पराभवाने भल्याभल्याचे खच्चीकरण झाल्याचे आपण आजवर पाहत आलो.पण विजय मिळवूनही जे पक्ष अस्वस्थ होतात,त्याला आपण ” स्वार्थासाठी सत्तेचा हव्यास,” असं म्हणतो.तर झालेल्या पराभवाने बोध घेऊन आत्मचिंतन न करणाऱ्यांना नेमके काय म्हणावे ? हे राजकीय विश्लेकानाही सध्या कळेनासे झाले आहे.

